मेकअप आर्टिस्टचा संशयास्पद मृत्यू, खार पोलिस आणि गुन्हे शाखेकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 06:43 AM2023-06-21T06:43:34+5:302023-06-21T06:44:17+5:30

कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. खार पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

Suspicious death of makeup artist, probe by Khar police and crime branch, Mumbai | मेकअप आर्टिस्टचा संशयास्पद मृत्यू, खार पोलिस आणि गुन्हे शाखेकडून चौकशी

मेकअप आर्टिस्टचा संशयास्पद मृत्यू, खार पोलिस आणि गुन्हे शाखेकडून चौकशी

googlenewsNext

मुंबई : सारा यंथन (२६) ही चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्ट  मंगळवारी रात्री खार दांडा येथील ती भाड्याने राहात असलेल्या फ्लॅटमध्ये हातावर जखमा तसेच रक्तबंबाळ स्थितीत मृतावस्थेत पंख्याला लटकलेली आढळली. कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. खार पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

मूळची नागालॅंड येथील सारा यंथन ही मुंबईत चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेबसीरिजमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती. बँकेत काम करणाऱ्या एका इसमासोबत संबंध होते आणि तो तिला लग्नासाठी बळजबरी करत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

रविवारी सकाळपासून सारा  फाेनला प्रतिसाद देत नव्हती. तिच्या फ्लॅटच्या भाड्याची रक्कम थकलेली असल्याने सोमवारी एजंट भाड्यासाठी पुन्हा तिच्या घरी गेला तेव्हा त्याला संशय आला. त्याने तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.  सोमवारी रात्री खार पोलिसांनी दरवाजा तोडला, तेव्हा सारा बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडली. पोलिसांना तिच्या दोन्ही हातावर कापल्याच्या खुणाही आढळल्या. 

पोलिसांनी नागालँडमध्ये राहणारी मृत साराची आई रोझी यांच्याशी संपर्क साधला. त्या मंगळवारी मुंबईत आल्या. खार पोलिसांनी मंगळवारी दुपारी कूपर हॉस्पिटलमध्ये सारा यंथनचे पोस्टमॉर्टम केले आणि मृतदेह तिच्या आईकडे सोपवला.
रोझी म्हणाल्या की, रिझर्व्ह बॅंकेत काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबतच्या नात्याबद्दल तिने शेअर केले होते. तो माणूस लग्नासाठी जबरदस्ती करत आहे, असे तिने सांगितले हाेते. 

बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडली  
बेडरूममध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात सापडली. तिला कोणीतरी मारून नंतर फासावर लटकवल्यासारखे दिसत आहे. मला संशय आहे की तिची हत्या झाली आहे आणि पोलिसांनी याची चौकशी करून माझ्या मुलीला न्याय द्यावा, असे रोझी यांनी स्पष्ट केले. पोलिस शवविच्छेदनाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Suspicious death of makeup artist, probe by Khar police and crime branch, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.