संशयास्पद! तरुण अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू, कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 07:00 PM2020-04-28T19:00:08+5:302020-04-28T19:04:41+5:30
शनिवारी रात्री ८ च्या सुमारास बजाजनगरातील एक हॉटेलमधून विराजने ऑनलाईन शेजवान चिकन मागविले.
नागपूर : बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुण अभियंत्याचा मृत्यू संशयास्पद ठरला आहे. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ऑनलाईन चिकन बोलवून खाल्ल्याच्या काही वेळेनंतर त्याचा मृत्यू झाला होता. त्याचे पोस्टमार्टेम झाल्यानंतर मंगळवारी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. विराज नरेंद्र ताकसांडे (२९) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज सॉफ्टवेअर इंजिनियर होता. त्याची स्वतःची कंपनी होती आणि काही दिवस तो कंपनी सेक्रेटरी म्हणूनही काम करीत होता. त्याचे आई-वडील मनीष नगरात राहतात. तर तो त्याची पत्नी पुजा हिच्यासह लक्ष्मी नगरातील आठ रस्ता चौकात असलेल्या अभिनव अपार्टमेंटमध्ये राहायचा.
शनिवारी रात्री ८ च्या सुमारास बजाजनगरातील एक हॉटेलमधून विराजने ऑनलाईन शेजवान चिकन मागविले. ९ वाजताच्या सुमारास पती-पत्नीने चिकन राईस आणि नूडल्स खाल्ले. त्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला दरदरून घाम फुटला होता. त्यामुळे त्याच्या पत्नीने लगेच त्याच्या मित्रांना फोन करून बोलवून घेतले. मित्र आल्यानंतर विराजला ऑरेंज सिटी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बजाजनगर पोलिसांना कळविले आणि विराजला मेडिकलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार विराजला रात्री ११ च्या सुमारास मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विराजची पत्नी पूजा हिने पोलिसांना ऑनलाईन चिकन मागवून आम्ही जेवलो आणि नंतर विराजची प्रकृती गंभीर झाल्याचे पोलिसांना सांगितले. डॉक्टरांनी विराजच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले नाही. मात्र, वीराजची कोरोना टेस्ट करून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, पोस्टमार्टेम सोबत त्याची कोरोना टेस्टही डॉक्टरांनी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर यांनी लोकमतला दिली.
मृत्यूचे कारण अंधारात
दरम्यान, विराजचा मृत्यू कशामुळे झाला ते अद्याप स्पष्ट झाले नाही. डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट केले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा आहे. त्याने मागविलेले ऑनलाइन चिकन आणि राईस पत्नीनेही त्याच्या सोबतच खाल्ले. तिला काही त्रास झाला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू चिकन खाल्ल्यामुळेच झाला की अन्य दुसरे कोणते कारण आहे, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.