स्वप्नील भूते खून प्रकरणात दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 07:04 PM2019-06-19T19:04:46+5:302019-06-19T19:05:14+5:30
बुलडाणा व औरंगाबाद येथून घेतले ताब्यात: प्रेमप्रकरणातून काढला काटा
धामणगाव धाड: जालना-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मासरूळ येथील स्वप्नील भूते नामक युकाच्या खून प्रकरणी भोकरदन आणि पारध पोलिसांनी (जि. जालना) केलेल्या संयुक्त कारवाईत बुलडाणा येथून एका अल्पवयीन मुलास तर औरंगाबाद येथून एकास अटक केली आहे. १४ जून रोजी जालना जिल्ह्यातील पारध शिवारातील एका शेतात स्वप्नील भुतेचा निर्घूण खून करण्यात आला. या प्रकरणात जालना पोलिसांनी अवघ्या ९६ तासात हे आरोपी जेरबंद केले आहेत. दरम्यान, आरोपींच्या प्रेमप्रकरणात व्यत्यय आणल्याच्या कारणावरून स्वप्नीलचा काटा काढण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर येत आहे.
या प्रकरणात भोकरदन पोलिसानी बुलडाण्याचा रहिवाशी असलेल्या कुमार अनूप सोनोने (रा. सुवर्णनगर) यास १९ जून रोजी पहाटे साखर झोपेत असताना औरंगाबाद येथील हनुमान नगरमधून अटक केली. दरम्यान, दुसºया आरोपीस पोलिसांच्या एका दुसºया पथकाने बुलडाणा येथून ताब्यात घेतले. प्रकरणातील दुसरा आरोपी हा अल्पवयीन आहे.
या प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, मृत स्वप्नील श्रीरंग भुते (रा. मासरूळ) याच्या निकटच्या नातेवाईकाच्या मुलीशी आरोपी कुमार अनुप सोनाने (रा. सुवर्णनगर) याचे प्रेमसंबध होते. याची कुणकूण लागताच स्वप्नील भुते याने कुमार अनुप सोनोने यास समजावून सांगितले होते. मात्र त्याकडे सोनोने याने कानाडोळा केला होता. दरम्यान, संबंधीत मुलीलाही स्वप्नील भुते याने समजावले होते. मात्र संबंधीत मुलीने हा प्रकार कुमार अनुप सोनोने यास सांगितला. सोबत सर्व प्रकार घरी कळल्यास आपल्यास जीव देण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे कुमार अनुप सोनोने यास सांगितले. त्यामुळे कुमार अनुप सोनोने याने स्वप्नीलचा काटा काढण्याचे ठरवले होते.
त्यानुषंगानेच कुमार अनुप सोनोने याने त्याचा अल्पवयीन मित्र यास सोबत घेऊन तिसºया मित्राची दुचाकी घेऊन १४ जून रोजी मासरूळ गाठत स्वप्नील बाबात विचारणा केली होती. स्वप्नीलच्या वडिलांनी तो शेतात गेल्याचे सांगितल्यावरून त्यांनी शेत गाठले होते. सोबतच स्वप्नीलला सोबत घेऊन पारध शिवारातील सुरडकर यांचे शेत गाठले होते. तेथे प्रेमसंबंधामध्ये बाधा का बनतोस असे सांगत स्वप्नीलशी त्यांची बाचाबाची झाली. त्यात कुमार अनुप सोनोने याने लगतच पडलेली बिअरची रिकामी बाटली स्वप्नीलच्या डोक्यात मारली. तसेच लाकडी राफ्टरनेने त्याच्यावर वार करत डोक्यात दगड टाकत स्वप्नीलचा खून केल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. त्यानंतर बुलडाणा गाठले होते. प्रकरणात पारध पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
प्रकरणी जालन्याचे पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक समाधन पवार, एसडीपीओ सुनील जायभाये यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून परिसरात चौकशी केली. त्यात स्वप्नीलच्या मित्रांकडून महत्त्वपूर्ण माहिती पोलिस यंत्रणेला मिळाली होती. त्या आधारावर दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसाना यश आले.
भ्रमणध्वनीवरील संभाषण ठरले महत्त्वाचे
आरोपींने दुचाकीवर बसण्यापूर्वी स्वप्नीलचे त्याच्या मोबाईल वरून कोणाशी तरी बोलणे केले होते अशी माहिती स्वप्नील सोबत शेतात बसलेल्या विजय साळवे यांच्याकडून पोलिसांना मिळाली होती. नेमका हाच धागा पकडून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत आरोपींनी अटक केली.
असे केले आरोपी अटक
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पारधचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, बुलडाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, पोलिस कर्मचारी रामेश्वर सिनकर, जगदीश बावणे, गणेश पायघन, सागर देवकर यांनी १९ जून रोजी औरंगाबाद येथील हनुमान नगरमधून पहाटे पाच वाजता कुमार सोनोनेला नातेवाईकाच्या घरात साखर झोपेत असताना अटक केली. त्यानंतर त्याने दुसºयाचे नाव सांगितले व बुलडाणा येथे थांबलेल्या एका दुसºया पथकाने अल्पवयीन असलेल्या एकास ताब्यात घेतले. त्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, प्रदीप पवार, पारध पोलीस ठाण्याचे प्रकाश सिनकर, बाजीराव माळी, किशोर मोरे, शिवाजी जाधव यांनी त्याकामी मदत केली.