फ्लिपकार्टमध्ये चोरी करून गेला स्विगीत! एमएचबी पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 01:33 PM2023-06-24T13:33:28+5:302023-06-24T13:33:37+5:30
तक्रारदार अभिषेक साईल (३३) हे कंपनीत मॅनेजर असून बोरीवली पश्चिमेच्या जयराजनगरमध्ये त्यांचे ऑफिस आहे.
मुंबई : ऑनलाइन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय शैलेश दिघसकर (४०) याला एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने डिलिव्हरी केलेल्या पार्सलचे जवळपास सव्वा लाख रुपये घेऊन तो पसार झाल्यावर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदार अभिषेक साईल (३३) हे कंपनीत मॅनेजर असून बोरीवली पश्चिमेच्या जयराजनगरमध्ये त्यांचे ऑफिस आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दीपक हिंडे व पोलिस शिपाई घोडके यांनी दिघसकरच्या मोबाइलचे सीडीआर व इतर तांत्रिक गोष्टींचे विश्लेषण केले. त्यानुसार त्याचा शोध घेऊन त्याला मीरा रोड परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी हा स्विगी कंपनीमध्ये ऑर्डर डिलिव्हरी करण्याचे काम करत होता. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन अटक केल्याचे कुडाळकर यांनी सांगितले.
दिघसकर हा वर्षभरापासून फ्लिपकार्टमध्ये काम करत होता. साईल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, १४ मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता तो कामावर आला आणि त्याने एकूण १५ पार्सल कॅश ऑन डिलिव्हरीचे घेतले. ते सर्वत्र देऊन आल्यानंतर पार्सल बॅग ऑफिसला ठेवली. नंतर घरी जाऊन जेवण करून येतो म्हणून सांगितले आणि परतलाच नाही, असे पोलिसांनी सांगितले.
उडवाउडवीची उत्तरे
ही बाब टीम लीडर रवींद्र धुरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शैलेशला फोन करत पैसे जमा न केल्याबाबत जाब विचारला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानुसार या प्रकरणी कंपनीने पोलिसात धाव घेतली. शैलेशविरोधात गुन्हा दाखल केला. फ्लिपकार्ट कंपनीचे १ लाख २३ हजार ४४७ रुपये त्याने पळवून नेले होते.