जुहू बीचच्या समुद्रात पोहणाऱ्या वकिलाची बॅग पळवली; गणवेश,फाईल्स,आयडीसह हजारोंची चोरी
By गौरी टेंबकर | Published: February 10, 2024 12:23 PM2024-02-10T12:23:54+5:302024-02-10T12:24:07+5:30
तक्रारदार वकील हे उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असल्याची माहिती आहे.
मुंबई: कुटुंबासह जुहू बीच फिरायला आलेल्या आणि त्यानंतर समुद्रात पोहायला उतरलेल्या वकिलाची बॅग शनिवारी अनोळखी व्यक्तीने पळवून नेली. याप्रकरणी त्यांनी जुहू पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार वकील हे उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असल्याची माहिती आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार ते शनिवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांसोबत जुहू चौपाटी फिरायला आले होते. त्यांच्याकडे एक राखाडी रंगाची बॅग होती ज्यामध्ये मोबाईल, वकिलाचा कोट, हायकोर्टाचा गाऊन एडवोकेट बार आयडी, कोर्ट केसेच्या दोन फाईल, स्टॅम्प पॅड, कोर्टाच्या बॅनर इत्यादी महत्त्वाच्या गोष्टीसह रोख रक्कमही होती. त्यांनी जेवण उरकले आणि त्यानंतर ती बॅग घेऊन ते पोलीस चौकीच्या जवळ असलेल्या रेतीवर गेले.
त्या ठिकाणी त्यांनी बॅग ठेवली आणि अंगावरचे कपडे काढून समुद्रामध्ये पोहण्यासाठी उतरले. ते जवळपास १५ मिनिट पाण्यात पोहत होते मात्र त्यांचे बॅगकडे लक्ष होते. थोड्या वेळाने त्यांच्या बॅग जवळ चहावाला, चणे विकणारा आणि इतर गोष्टी विक्री करणारे लोक जमा होऊन गर्दी वाढू लागली. त्यामुळे त्यांना त्यांची बॅग दिसली नाही आणि ते पाण्यातून बाहेर आले. ते जवळच्या पोलीस चौकीत गेले आणि त्यांनी बॅगबाबत विचारणा केली. पण पोलिसांकडेही त्याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यांनी आसपास सर्वत्र बॅगचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. अखेर याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात जुहू पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करवला.पोलीस अनोळखी चोराचा शोध घेत आहेत.