बॉम्ब नसून ती निघाली स्विगीची बॅग; दादरच्या टिळक ब्रिजवर खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 14:21 IST2019-03-28T14:21:37+5:302019-03-28T14:21:59+5:30
सायन ते सीएसएमटीदरम्यान वाहतूक खोळंबली

बॉम्ब नसून ती निघाली स्विगीची बॅग; दादरच्या टिळक ब्रिजवर खळबळ
मुंबई - दादर पूर्वेकडील चित्रा टॉल्किजसमोर टिळक ब्रिजवर आज सकाळी १०. ३० वाजताच्या सुमारास बेवारस बॅग सापडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. तसेच परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ देखील माजली. घटनास्थळी भोईवाडा पोलीस आणि बीडीडीएसचं पथक पोचले आणि बागेची तपासणी केली असता स्विगी या फूड डिलेव्हरी बॉयची बॅग असल्याचं उघड झालं.
आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला चित्रा टॉल्किजसमोरील टिळक ब्रिजवर एक बेवारस बॅग असल्याबाबत फोन प्राप्त झाला. त्यानंतर नियंत्रण कक्षाने संबंधित भोईवाडा पोलीस ठाण्याला कळविले. त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि बॅग उचलून पहिली तर खूप जड लागत होती. लोकसभा पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून भोईवाडा पोलिसांनी बीडीडीएस पथक बोलावले आणि बॅगची तपासणी केली. तपासणीत बॉम्बची बॅग नसून ती स्विगी फूड डिलेव्हरी बॉयची बॅग असल्याचं आढळून आलं. बॅगेत ऑर्डर केलेले दुपारचे जेवण आणि बिल तसेच मोबाईलचे चार्जर सापडले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार फूड डिलेव्हरी लवकरात लवकर कारवी म्हणून बाईक जलद वेगाने चालविली असताना बॅग ब्रिजवर पडली असावी. मात्र या घटनेदरम्यान १०. ३० ते ११. ३० वाजेपर्यंत सायन ते सीएसटीएम हायवेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झालेला होता.