हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी आलेल्या युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 08:04 PM2020-03-05T20:04:22+5:302020-03-05T20:04:52+5:30

रस्त्यावर उभ्या असलेल्या महापालिकेच्या कचरा गाडीच्या पलीकडे नेवून तलवारीने वार

Sword attack on youth in kivale | हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी आलेल्या युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला 

हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी आलेल्या युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला 

Next

देहूरोड : देहूरोड -कात्रज बाह्यवळण मार्गावरील किवळे ते विकासनगर सेवा रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी आलेल्या युवकाला हॉटेलच्या बाहेर ओढत नेऊन तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. हल्लेखोर  दुचाकीवरून आले होते. जखमी युवकावर देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 
 प्रशांत भालेराव  ( वय अंदाजे २०  रा. निगडी  )असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार किवळे येथील एका हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी तीन युवक आले होते. त्यावेळी त्यांच्यामागून आणखी तीन -चार युवक हॉटेलमध्ये शिरले. त्यांनी हॉटेलमध्ये बसलेल्या तिघांपैकी एकाला हॉटेल बाहेर  सेवा रस्त्यावर ओढत नेले. रस्त्यावर उभ्या असलेल्या महापालिकेच्या कचरा गाडीच्या पलीकडे नेवून त्याच्यावर तलवारीने वार केले. यात त्याचे एक बोट तुटले असून डोक्याला तसेच पायाला दोन ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमीवर उपचार सुरु आहेत. हॉटेलजवळ असलेल्या एका डॉक्टरने जखमी युवकास देहूरोड येथे रुग्णालयात दाखल केले. घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार निगडी येथील एका महाविद्यालयाजवळ काही युवकांची झालेली भांडणे सोडवायला संबंधित जखमी गेला होता. हल्ला केल्यानंतर मुकाई चौक मार्गे रावेतच्या दिशेने हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. हॉटेलच्या सीसीटीव्हीत संबंधित घटना कैद झाली की नाही याची माहिती मिळू शकली नाही. युवकावरील हल्ल्याची माहिती मिळताच देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असून पुढील तपास करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.
 

Web Title: Sword attack on youth in kivale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.