युवराज भदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार, अटकपूर्व जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 08:49 PM2022-03-10T20:49:12+5:302022-03-10T20:50:12+5:30
Anticipatory Bail Rejected : फरार असलेल्या भदाणे याचे कल्याण व ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने, त्याच्यावर अटकेची तलवार टांगती आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेत नोकरी साठी जन्मदाखल्यात फेरफार केल्या प्रकरणी मध्यवर्ती तर नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तुर्भे येथील पोलीस ठाण्यात युवराज भदाणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले. दरम्यान फरार असलेल्या भदाणे याचे कल्याण व ठाणे न्यायालयानेअटकपूर्व जामीन फेटाळल्याने, त्याच्यावर अटकेची तलवार टांगती आहे.
उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी नोकरी मिळविण्यासाठी जन्मतारखेत फेरफार केल्या बाबत व पीएचडी पदवी अवैध असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला. याप्रकरणी २१ फेब्रुवारी रोजी भदाणे यांच्यावर महापालिकेच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेंव्हा पासून भदाणे फरार आहे. दरम्यान नवीमुंबई येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात उल्हासनगरातील एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हाही भदाणे यांच्यावर दाखल झाला. भदाणे याने वकील मार्फत दोन्ही गुन्ह्यात अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी ठाणे व कल्याण न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र दोन्ही गुन्ह्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने भदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकलेली आहे. मध्यवर्ती व एपीएमसी पोलीस भदाणे यांच्या मार्गावर असून केव्हाही अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भदाणे यांच्यावर गुन्हे दाखल होऊन १८ दिवस उलटल्यानंतरही अटक होत नसल्याने, पोलीस करवाईवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. महापालिकेत जनसंपर्क अधिकारी नोकरीसाठी जन्मतारखेत फेरफार केल्या प्रकरणी व पीएचडी पदवी अवैध प्रकरणी युवराज भदाणे यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून १८ दिवस उलटून गेले. मात्र आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी अद्यापही भदाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे भदाणे पोलिसांच्या हाती सापडत नाही. तर दुसरीकडे महापालिका आयुक्त त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत नसल्या बाबत मध्यवर्ती पोलीस व महापालिका आयुक्त यांच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली आहे. तसेच आयुक्तांच्या बदलीची व मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या बदलीची मागणी होत आहे