तलवार, हंटर बाळगले; कर्नाटकातील दोघांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 08:12 PM2022-07-19T20:12:00+5:302022-07-19T20:12:46+5:30
कासार शिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासार शिरसी (जि. लातूर) : येथील विश्रामगृह परिसरात घातपाताच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना कासार शिरसी पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. याबाबत कासार शिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कर्नाटक राज्यातील आनंदवाडी (ता. बसवकल्याण जि. बिदर) येथील देविदास विलास भोगिले (२२) आणि अर्जुन अंकुश इनामदार (१९) हे दोघेही निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथील विश्रामगृह परिसरात संशयास्पद फिरताना आढळून आले.
याबाबत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली. शिवाय, झाडाझडती घेतली असता, एक तलवार, हंटर पोलिसांच्या हाती लागले. घातपात करण्याच्या उद्देशाने हे दोघे बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी त्यांना अटक केली असून, याबाबत कासार शिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.