सिंबायोसिस गुणवाढ प्रकरण: मुल्यमापन प्रमुखाने घेतले तब्बल २० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 03:42 PM2020-09-22T15:42:11+5:302020-09-22T15:46:47+5:30

बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन १७८ विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यासाठी तब्बल २० लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न

Symbiosis Quality Improvement Case: Rs 20 lakhs accepated by Evaluation Head | सिंबायोसिस गुणवाढ प्रकरण: मुल्यमापन प्रमुखाने घेतले तब्बल २० लाख रुपये

सिंबायोसिस गुणवाढ प्रकरण: मुल्यमापन प्रमुखाने घेतले तब्बल २० लाख रुपये

Next
ठळक मुद्देसुमित अग्रवालला दिला होता ११ हजार विद्यार्थ्यांचा डाटा

पुणे : स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांचे गुणांचे पुनर्मूल्यमापन करताना १७८ विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यासाठी मुल्यमापन प्रमुख संदीप हेंगले याने तब्बल २० लाख रुपये घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्याने सुमित अग्रवाल याच्याकडे ११ हजार विद्यार्थ्यांचा डाटा हस्तांतरीत केला होता. सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही माहिती पुढे आली आहे.
      सुमित मुरारीलाल अग्रवाल (वय ३५, रा.अलवर, राजस्थान) याला सायबर पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली.या अगोदर मुल्यमापन प्रमुख संदीप रामकृष्ण हेंगले (वय ४९, रा. गणेशमळा, धायरी) याला अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
      हा प्रकार मॉडेल कॉलनीतील सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीत सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान घडला होता.संदीप हेंगळे हा सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा मुल्यमापन विभागाचा प्रमुख अधिकारी होता. हेंगले याने सुमित अग्रवाल याच्याशी संपर्क करुन विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन १७८ विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना पास केल्याचे उघडकीस आले आहे. हेंगले आणि अमित अग्रवाल यांचा २०१८ पासून संपर्कात आहे. संदीप हेंगले याने सुमित अग्रवाल याच्याशी संपर्क साधण्यासाठी दोन वेगळ्या नावाने ई मेल आय डी तयार केले होते. त्याद्वारे हेंगले हा सुमित अग्रवाल याच्याशी संपर्कात होता. हेंगले याने सुमित याला सिंबायोसिसच्या ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा डेटा दिला होता. त्या डेट्यामध्ये अनुउत्तीर्ण विद्यार्थींचे संपर्क क्रमांक होते.सुमित अग्रवाल हा संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क करुन त्यांच्याकडून पास करुन देण्यासाठी पैसे घेत होता. जे विद्यार्थी पैसे देत, त्यांचे पैसे व यादी सुमित अग्रवाल हेंगले यास पाठवित होता. सुमित अग्रवाल याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या पैशांपैकी २० लाखाहून अधिक रुपये हेंगले याला दिले आहे. हे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी सुमित याला अटक करुन  न्यायालयात हजर केले.
             सुमित अग्रवाल व हेंगले यांमध्ये मेलद्वारे, व्हॉटसअ‍ॅप व ईमेलद्वारे संपर्क केला आहे़ त्यामुळे त्यांच्या ई मेलची पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच ई मेल आय डी ज्या डिव्हाईसमध्ये वापरण्यात आले ते डिव्हाईस जप्त करायचे आहे. सुमित अग्रवाल याने किती विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले, कसे घेतले व आरोपी हेंगले याला कसे पोहचविले, याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे. हेंगले याने सुमितला ११ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा डेटा दिल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. हा डेटा वापरुन सुमित याने आणखी काही विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे का याचा तपास करायचा आहे. तसेच या गुन्ह्यात सिंबायोसिसमधील आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने अधिक तपासासाठी २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

़़़़़़़़़
सुमित अग्रवाल माजी विद्यार्थी
सुमित अग्रवाल हा सिंबायोसिसचा माजी विद्यार्थी आहे. त्याने ओपन एज्युकेशनमधून एक डिप्लोमा केला होता. त्यावेळी त्याने सोयीस्कर सेंटर मिळावे, यासाठी हेंगले याच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी पैसे घेऊन विद्यार्थ्यांना पास करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

 

Web Title: Symbiosis Quality Improvement Case: Rs 20 lakhs accepated by Evaluation Head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.