तबलिगी मरकज प्रकरण : १४ वेगवेगळ्या देशाच्या ३६ नागरिकांची निर्दोष मुक्तता
By पूनम अपराज | Published: December 16, 2020 09:36 PM2020-12-16T21:36:37+5:302020-12-16T21:37:14+5:30
Tablighi Markaz case: मुख्य महानगर दंडाधिकारी अरुण कुमार गर्ग यांनी १४ वेगवेगळ्या देशांच्या या नागरिकांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे.
नवी दिल्लीच्यान्यायालयाने मरकझच्या निमित्ताने कोरोनाकाळात कार्यक्रमात वेगवेगळ्या देशातून सामील झालेल्या ३६ परदेशी आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तबलिगी मरकझमध्ये सहभागी झालेल्या या आरोपींवर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची काळात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मुख्य महानगर दंडाधिकारी अरुण कुमार गर्ग यांनी १४ वेगवेगळ्या देशांच्या या नागरिकांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. २४ ऑगस्ट रोजी भारतीय दंड विधानाच्या कलम २६९ (संसर्ग काळात बेजबाबदारपणे वागणे), १८८ अन्वये (सरकारनं लागू केलेल्या आदेशांचं पालन न करणे) त्याचप्रमाणे महामारी कायद्याच्या कलम ३ (नियमांचं उल्लंघन करणे) या आरोपांखाली परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ नुसार त्यांच्याविरूद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते.
न्यायालयाने या आरोपींविरोधात लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावत या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे देता आले नसल्याचे कोर्टाने स्पष्ट करत दिल्लीपोलिसांना खडसावले आहे. मरकझ परिसरात आरोपींची उपस्थिती सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले असल्याचे सुनावणीदरम्यान कोर्टाच्या निदर्शनास आले तसेच साक्षीदारांच्या निवेदनातही विरोधाभास आढळून आला आहे.