ताडी विक्रेत्यानेच लपविला मृत ग्राहकाचा मोबाइल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 01:13 PM2019-08-06T13:13:51+5:302019-08-06T13:17:27+5:30
या प्रकरणातील हा महत्त्वाचा पुरावा सोमवारी रात्री खार येथून हस्तगत केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई - ताडीच्या अतिप्राशनामुळे सुनील मोरे (३९) याचा मोबाइल ताडी विक्रेत्यानेच स्वत:च्या घरात लपवून ठेवला होता. या प्रकरणातील हा महत्त्वाचा पुरावा सोमवारी रात्री खार येथून हस्तगत केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
नशेत असलेल्या मोरेला ताडीविक्री केंद्रातून बाहेर काढत त्याला खारच्या रोड क्रमांक १७ वर फेकण्यात आले होते. त्याचा तेथेच मृत्यू झाला. त्याला रस्त्यावर मरण्यासाठी सोडून गेलेला बालाजी ताडीमाडी विक्री केंद्राचा मालक गोपाल नरेला (२४) आणि त्यासाठी त्याला मदत करणारे त्याचे दोन कर्मचारी महेश वडेट्टी आणि साईकुमार वाखाला यांना खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक आणि नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने शिताफीने अटक केली. नरेला याने पुरावा मिटवण्यासाठी मोरे याचा मोबाइल काढून घेतला आणि स्वत:च्या कुर्ला येथील घरात लपवून ठेवला. नरेलाकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब उघड झाली. त्यानुसार त्याच्या कुर्ला येथील घरातून पोलिसांनी मोरेचा मोबाइल हस्तगत केला. अटक संशयित आरोपींना न्यायालयाने ९ ऑगस्ट, २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खार पश्चिमच्या रोड क्रमांक १७ वर शनिवारी रात्री बेशुद्धावस्थेत एक व्यक्ती सापडली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. त्या व्यक्तीच्या आईने तो हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर त्याचे नाव सुनील मोरे असून त्याला ताडीचे व्यसन असल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी सहा तासांत आरोपींना अटक केली.