निवडणुकीला गालबोट : शिवसेना उमेदवाराच्या जावयाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:19 AM2020-01-07T00:19:24+5:302020-01-07T00:21:57+5:30
कन्हान नगर परिषद निवडणूक दोन दिवसावर आली असताना शिवसेनेचे प्रभाग - ८ चे उमेदवार डायनल शेंडे यांचे जावई संजू खडसे (३५, रा. सत्रापूर, कन्हान, ता. पारशिवनी) यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कन्हान) : कन्हान नगर परिषद निवडणूक दोन दिवसावर आली असताना शिवसेनेचे प्रभाग - ८ चे उमेदवार डायनल शेंडे यांचे जावई संजू खडसे (३५, रा. सत्रापूर, कन्हान, ता. पारशिवनी) यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना कन्हान शहरात सोमवारी रात्री १०.१५ ते १०.३० वाजताच्या दरम्यान घडली.
संजू खडसे हे कन्हान शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील गौरव बारमध्ये एकटेच दारू पित बसले होते. त्यांच्या बाजूला अन्य तिघे दारू पित होते. तिघांना दारू चढल्याने त्यांनी ग्लासची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यामुळे संजू यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच त्यांच्यात पुन्हा भांडणाला सुरुवात झाल्याने ते बारच्या बाहेर आले. तिथे तिघांनीही संजय यांना जबर मारहाण करायला केली. त्यातच त्यांनी संजूच्या पोट, मांडी व चेहऱ्यावर चाकू व फुटलेल्या बाटलीने वार केले. ते रक्तबंबाळ अवस्थेत कोसळताच तिघांनीही तिथून पळ काढला.
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी संजू यांना लगेच कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिस्तो आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी लगेच घटनास्थळ गाठून बीअर बार आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. संजू यांचा खून करणारे तिन्ही आरोपी कन्हान येथील रहिवासी असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी आरोपींची नावे मात्र उघड केली नाही. दुसरीकडे संजू यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिकांनी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ गर्दी केली होती. गौरव बार हा बंद करण्यात आल्यानंतरही काहींनी तो उघडायला लावला होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.