भावाच्या खूनाचा सूड घेण्यासाठी बहिणीनेच रचला होता प्लॅन, फिल्मी स्टाइल करणार होते आरोपीची हत्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 09:04 AM2021-01-12T09:04:41+5:302021-01-12T09:07:27+5:30
जून २०२० मध्ये मालाडमध्ये पार्किंगच्या वादावरून दोन गटात भांडण झालं होतं. ज्यात एक आरोपी मोहम्मद सादिकने भांडणादरम्यान २४ वर्षाच्या अल्ताफ शेखची हत्या केली होती.
मुंबईमध्ये एका बहिणीने आपल्या भावाच्या खूनाचा सूड घेण्यासाठी असा प्लॅन केला की वाचून हैराण व्हाल. भावाच्या मारेकऱ्यांना मारण्यासाठी आधी तिने त्याला हनी ट्रॅपमध्ये फसवलं, नंतर मित्रांच्या मदतीने त्याला जंगलात नेऊन संपण्याचा प्लॅन केला. पण त्याआधी पोलिसांनी महिलेसहीत ५ लोकांना अटक केली.
काय आहे प्रकरण?
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, जून २०२० मध्ये मालाडमध्ये पार्किंगच्या वादावरून दोन गटात भांडण झालं होतं. ज्यात एक आरोपी मोहम्मद सादिकने भांडणादरम्यान २४ वर्षाच्या अल्ताफ शेखची हत्या केली होती. हत्येनंतर सादिक दिल्लीला पळून गेला होता. या घटनेमुळे अल्ताफची बहीण यासमीन धक्क्यात होती आणि तिने भावाच्या हत्येचा सूड घेण्याचा निर्णय घेतला. तिने अल्ताफचे मित्र फारूक शेख (20), ओवैस शेख (18), मनीस सैय्यद (20), जाकिर खान (32) आणि सत्यम पांडे (23) यांना सोबत घेतलं आणि यांच्या मदतीने सादिकला मारण्याचा प्लॅन केला.
असा केला होता प्लॅन
हत्येच्या एक महिन्यानंतर यासमीन आणि अल्ताफचे सर्व मित्र मालवानी भागात भेटले आणि सादिकला मारण्याचा प्लॅन आखला. त्यांनी सादिकला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा निर्णय घेतला. यासाठी यासमीनने फेक इन्स्टाग्राम अकाउंट तयार केलं आणि सादिकसोबत बोलणं सुरू केलं. यादरम्यान तिने सादिकसोबत प्रेमाचं नाटक केलं. एका आठवड्यानंतर सादिक यासमीनला भेटण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला.
शनिवारी यासमीनने मुंबईतील छोटा काश्मीर भागात सादिकला भेटण्यासाठी बोलवलं. पण ती स्वत: तिथे नव्हती. तिचे ५ मित्र एका रूग्णवाहिकेत सादिकची वाट बघत होते. सादिक तिथे पोहोचताच त्याला किडनॅप करण्यात आलं. ते सादिक घेऊन वसई-नायगांव जंगलात जाणार होते आणि तिथे त्याला मारून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते.
असा सगळा प्लॅन फिस्कटला
हे सगळं होत असताना एका स्थानिक व्यक्तीने सादिकला जबरदस्ती रूग्णवाहिकेत टाकताना पाहिलं. त्याने १०० नंबर डायल करून याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर परिसरातील पोलिसांना अलर्ट देण्यात आला आणि तपास सुरू झाला. पळून जात असताना आरोपींच्या गाडीतील पेट्रोल संपलं त्यामुळे त्यांनी एक एनोव्हा गाडी भाड्याने घेतली.
पोलिसांनी पकडलं
पश्मिच एक्सप्रेस हायवेवर जेव्हा सगळे आरोपी सादिकला किडनॅप करून दहिसर चेक नाक्यावरून जात होते तेव्हा नाकाबंदी दरम्यान सर्वांना अटक करण्यात आली आणि सादिकचा जीव वाचवण्यात आला. किडनॅप केसप्रकरणी यासमीन आणि तिच्या पाचही मित्रांना पोलिसांनी अटक केली असून तपासही सुरू केला आहे.