बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा; एका दिवसात दहा लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 09:07 PM2019-12-22T21:07:10+5:302019-12-22T21:09:26+5:30
पोलिसांची अचानक तपासणी मोहीम
सातारा - वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने जिल्हा वाहतूक शाखा आणि सातारा शहर वाहतूक शाखेने अचानक तपासणी मोहीम राबवून एका दिवसात तब्बल दहा लाखांचा दंड वसूल केला.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत आणि सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी २१ डिसेंबर रोजी विशेष मोहिमेचे नियोजन केले. महामार्ग तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार ४०७ बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध मोटार वाहन कायद्यान्वे कारवाई करून त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
सातारा शहर वाहतूक शाखेकडून १ हजार २१२ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३ लाख ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण १० लाखांचा दंड एकाच दिवशी वसूल करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी यापुढे सुद्धा अचानक अशा प्रकारची मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी केले आहे.