वाईच्या तलाठ्यासह मदतनीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 22:06 IST2022-07-23T22:05:13+5:302022-07-23T22:06:07+5:30
Satara : लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली असता तलाठी भिसे हा लाच मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी वाईतील चावडी चौकात सापळा लावला.

वाईच्या तलाठ्यासह मदतनीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!
वाई: सातबाऱ्यावरील ३२ ग ची नोंद कमी करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना वाईचे तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे (वय ५२, रा. सोनगिरीवाडी, वाई) व त्याचा खासगी मदतनीस संतोष चंद्रकांत भिलारे (वय ४३, रा. धावडी, ता. वाई) या दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई वाईतील चावडी चाैकात शनिवारी दुपारी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराने चुलत भावाकडून खरेदी केलेल्या दोन गुंठे प्लॉटचे सातबाऱ्यावरील ३२ ग ची नोंद कमी करण्यासाठी अर्ज दिला होता. तलाठी पांडुरंग भिसे याने यासाठी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागामध्ये रितसर लेखी तक्रार दिली. लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली असता तलाठी भिसे हा लाच मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी वार्इतील चावडी चौकात सापळा लावला.
यावेळी मदतनीस संतोष भिलारे याला दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवार्इमुळे वार्इमध्ये खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक सचिन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस नार्इक प्रशांत ताटे, विशाल खरात, मारूती अडागळे, संभाजी काटकर यांनी ही कारवार्इ केली.