बीडमध्ये १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी चतुर्भूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:11 PM2018-08-31T17:11:21+5:302018-08-31T17:12:47+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव सज्जाच्या महिला तलाठी धनश्री तुकाराम चव्हाण यांना १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले.
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव सज्जाच्या महिला तलाठी धनश्री तुकाराम चव्हाण यांना १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी अंबाजोगाई शहरात करण्यात आली.
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच चव्हाण यांनी मागितली होती. याबाबत तक्रारदाराने तात्काळ एसीबीकडे तक्रार केली. पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी तक्रारीची शहानिशा केली. ३० पैकी १० हजार रुपये शुक्रवारी स्वीकारण्याचे ठरले. त्याप्रमाणे अंबाजोगाई शहरातील रिंगरोडवरील छत्रपतीनगरमध्ये चव्हाण यांच्या राहत्या घरी सापळा लावला. १० हजार रुपये स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या अधिकाऱ्यांनी झडप घालत चव्हाण यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पो. ह. दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, पो. ना. विकास मुंडे, अमोल बागलाने, चालक सय्यद नदीम यांनी केली.