मालवणच्या वायंगणीचा लाचखोर तलाठी विठ्ठल कंठाळे 'अँटीकरप्शन'च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 08:51 AM2022-03-22T08:51:13+5:302022-03-22T08:51:25+5:30
२५ हजारांची लाच मागितल्याने अटक; वाळू व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार कारवाई
मालवण : वाळू उपशावर कारवाई न करण्यासाठी तोंडवळी गावातील वाळू व्यावसायिकाकडे २५ हजारांची मागणी करणाऱ्या वायंगणी तलाठी विठ्ठल वैजीनाथ कंठाळे (३४) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे आपल्या मित्रां समवेत तोंडवळी खाडी किनारी वाळूचा व्यवसाय करतात. त्यामुळे तलाठी कंठाळे हे वाळू उपसा करणाऱ्या रॅम्पवर येऊन तसेच वाळूच्या गाड्या थांबवून कारवाई न करण्यासाठी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून याठिकाणी वाळू उपशाचे टेंडर मंजूर होऊनही अद्याप वाळू उपशाचे पास प्राप्त न झाल्याने गेले १५ ते २० दिवस तक्रारदार यांनी वाळू उपसा बंद ठेवला असतानाही तलाठी कंठाळे यांनी त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे याबाबत तक्रारदार यांनी ५ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या तक्रारीची पडताळणी करून सोमवारी २१ मार्च रोजी तक्रारदार यांच्या वाळू व्यवसायावर कारवाई न करण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी तलाठी कंठाळे याला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, स.पो. उपनिरिक्षक फाले, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, परब, पोलीस नाईक पालकर, पेडणेकर यांनी सहभाग घेतला. भ्रष्टाचाराबाबत काहीही माहिती असल्यास किंवा भ्रष्टाचारी लोकसेवका बद्दल तक्रार द्यायची असल्यास नागरिकांनी अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्ग विभाग, कार्यालय कुडाळ ०२३६२-२२२२८९ किंवा टोल फ्री नंबर १०६४ याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.