तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला केली अटक; नागपुरात पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 07:23 AM2021-06-17T07:23:49+5:302021-06-17T07:24:03+5:30
दिघोरी परिसरात राहत असलेल्या नूरचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी नूरवर नजर ठेवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तालिबानी अतिरेक्यांच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. नूर मोहम्मद (वय अंदाजे ३० वर्षे) असे या संशयित अफगाणी नागरिकाचे नाव आहे. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला होता. तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करीत असल्याचे तपासात उघड झाले. नूरचा मतीन नामक साथीदार अचानक फरार झाल्याने संशय गडद झाला आहे.
दिघोरी परिसरात राहत असलेल्या नूरचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी नूरवर नजर ठेवली. सोशल मीडियावर तो तालिबानी अतिरेक्यांना फॉलो करीत असल्याचे लक्षात येताच विशेष शाखा व गुन्हे शाखेच्या पथकांनी मंगळवारी नूरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्सही मिळाले. तो येथे २०१० पासून वास्तव्याला होता. नूरच्या शरीरातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याचे निशाण आहे. तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करीत असल्याच्या अनुषंगाने चाैकशी करीत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले. अतिरेकी कारवायांमध्ये त्याचा काही सहभाग होता याचाही शोध
पोलीस घेत आहेत.
साथीदार मतीन फरार
n नूर येथे मतीन नामक साथीदारासह राहत होता. हे दोघे २०१० मध्ये नागपुरात येण्यापूर्वी नूर राहत असलेले गाव तालिबानी अतिरेक्यांचा गड मानले जाते. तिथे त्याच्या कुटुंबात आईवडील व दोन भाऊ होते.
n आईवडील व एका भावाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ बेपत्ता असल्याचे नूरने सांगितल्याचे समजते. नूरला पकडल्याचे लक्षात येताच मतीन फरार झाल्याने संशय वाढला आहे.
n कंबल विकणाऱ्या मतीनने नंतर नागपुरात अवैध सावकारी सुरू केली. तसेच मोठी मालमत्ताही नागपुरात खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. मतीनविरुद्ध २०१७ मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. तो आसाम, मेघालयकडे पळाल्याचा संशय आहे.
रेकी केल्याचा संशय
n नागपूर विविध दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर खूप वर्षांपासून आहे. तब्बल ११ वर्षांपासून नागपुरात अवैध वास्तव्य करणाऱ्या नूर आणि मतीनने नागपूरची रेकी करून तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर काही मटेरियल पाठवले का, असा संशय आहे.
n त्यामुळे आम्ही कसून चाैकशी करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.