स्मशानात खोदून मुलाने आईचा मृतदेह घरी आणला; मानसिक स्थिती बिघडलेली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 07:18 AM2021-12-27T07:18:54+5:302021-12-27T07:18:54+5:30
Tamil Nadu: बालामुरूगन याने यापूर्वीही त्याच्या आईचा मृतदेह मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला स्थानिक रहिवाशांनी तेथेच थांबवले होते.
त्रिची (तामिळनाडू) : स्मशानभूमीत खोदून मुलाने घरी आणलेला त्याच्या आईचा अर्धवट सडलेला मृतदेह पेराम्बलूर जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेऊन सरकारी रुग्णालयात पाठवला. या महिलेच्या मानसिक स्थिती बिघडलेल्या व्ही. बालामुरूगन (३८, रा. परावाई खेडे) या मुलाला अटक करण्यात आली आहे. तो मृतदेहाचे घरी संरक्षण करीत होता.
बालामुरूगन याने यापूर्वीही त्याच्या आईचा मृतदेह मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला स्थानिक रहिवाशांनी तेथेच थांबवले होते. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुटुंबीयांच्या उपस्थितीत केले जातील. बालामुरूगन याला जेवण देण्यासाठी त्याचा एक नातेवाईक घरी आल्यावर मृतदेहाचा प्रकार उघडकीस आला. नातेवाइकाला घरात दुर्गंधी आली. नंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. बालामुरूगनने गुप्तपणे स्मशानभूमीत खोदून शुक्रवारी पहाटे मृतदेह घरी आणला. तो वारंवार तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तेथे जायचा.
स्वत:शीच बोलायचा
बालामुरूगनच्या आईचे १० महिन्यांपूर्वी प्रदीर्घ आजाराने निधन झाले, तर त्याच्या वडिलांचे १० वर्षांपूर्वी. बालामुरूगन हा अविवाहित आणि बेरोजगार असल्यामुळे त्याचे आई-वडील त्याची काळजी घ्यायचे. तो खेड्यातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणी वारंवार जायचा व स्वत:शीच बोलायचा.