विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचे जाहीर होताच पती झाला खूश, पत्नीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 01:37 PM2018-10-01T13:37:39+5:302018-10-01T13:38:03+5:30
विवाहबाह्य संबंध ठेवणे हा आता गुन्हा राहिलेला नसल्याचे सांगत तू आता मला अशा संबंधांपासून रोखू शकत नाहीस, असे पतीने सांगितल्याने धक्का बसलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
चेन्नई - विवाहबाह्य संबंध हे गुन्हा नसल्याचा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भातील कलम 497 रद्द केल्यानंतर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. विवाहबाह्य संबंध ठेवणे हा आता गुन्हा राहिलेला नसल्याचे सांगत तू आता मला अशा संबंधांपासून रोखू शकत नाहीस, असे पतीने सांगितल्याने धक्का बसलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये घडली असून, मृत महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमधून हा प्रकार उघडकीस आला आहे. पुष्पलता असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती जॉन पॉल फ्रँकलिन याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जॉन हा एका पार्कमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतो.
दोन वर्षांपूर्वी पुष्पा आणि जॉन यांचा विवाह झाला होता. त्यावेळी दोघांनीही आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. मात्र त्यांच्यातील प्रेम फार काळ टिकले नाही. काही काळाने पुष्पलताला टीबी झाला. त्यामुळे जॉन तिच्यापासून दूर राहू लागला. त्याचदरम्यान, जॉनच्या एका मित्राने पुष्पाला तिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती दिली. त्यानंतर पुष्पाने जॉनला त्या महिलेपासून दूर राहण्यास सांगतले. मात्र आता तू माझ्याविरोधात तक्रार करू शकत नाहीस, कारण सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नसल्याचे जाहीर केले आहेत, असे जॉनने पुष्पाला सांगितले. त्यामुळे धक्का बसलेल्या पुष्पाने आत्महत्या केली.