भन्नाट शक्कल! मास्क, स्प्रेचा वापर करत १५ किलोंचे दागिने लंपास; चोरांचा पराक्रम सारेच चकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 04:48 PM2021-12-18T16:48:52+5:302021-12-18T16:49:16+5:30
पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू; एकही पुरावा मागे राहू नये म्हणून चोरट्यांनी लढवली शक्कल
चेन्नई: कोणतंही काम करताना डोक्याचा वापर करावा लागतो. त्यात चोरांना तर अधिक डोकं लावावं लागतं. मागे कोणताही पुरावा राहू नये यासाठी चोर चलाखीनं कामं करतात. तमिळनाडूच्या वेल्लोरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी शक्कल लढवून केलेल्या चोरीनं आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे. चोरी पकडली जाऊ नये म्हणून चोरट्यांनी भलतंच डोकं लावलं.
वेल्लोरमधील एका दागिन्यांच्या दुकानांत चोरी झाली. चोरांनी १५ किलोचे दागिने चोरले. त्याचं बाजारमूल्य ८ कोटी रुपयांच्या घरात आहे. याशिवाय काही हिऱ्यांचे दागिनेदेखील चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी संपूर्ण नियोजनासह ही चोरी केली. चोरट्यांनी इमारतीच्या मागच्या भागातून आत शिरले. भगदाड पाडून आत आल्यानंतर त्यांनी दुकानातील सर्वच्या सर्व १२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारले. आपल्याला कोणीच ओळखू नये, पुरावा मागे राहू नये यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारले.
यानंतर चोरट्यांनी दागिन्यांवर हात साफ करण्यास सुरुवात केली. १५ किलो सोन्याचे दागिने आणि हिऱ्यांची आभूषणं घेऊन चोरटे फरार झाले. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर दिसून आला. त्याच्या चेहऱ्यावर प्राण्याचा मास्क आहे. सकाळी कर्मचाऱ्यांनी दुकान उघडताच चोरी झाल्याचं समजलं. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी ४ पथकं तयार करण्यात आली आहेत. काही पुरावे हाती लागले असून त्याआधारे लवकरच चोरट्यांना पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.