'तनिष्क' जाहिरातीचा वाद! हल्ल्याची माहिती खोटी, गुजरातच्या शोरूमला आले धमकीचे कॉल
By पूनम अपराज | Published: October 14, 2020 03:47 PM2020-10-14T15:47:39+5:302020-10-14T15:48:37+5:30
'Tanishq' advertisement controversy :अजूनही धमकीचे कॉल येत असल्याची माहिती कच्छ (पूर्व) चे पोलीस अधीक्षक मयूर पाटील यांनी दिली.
नानाविध दागिन्यांमधील लोकप्रिय ब्राण्ड असलेल्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील कच्छ येथील शोरूमवर हल्ला झाला आहे. ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन हा वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोल झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ने मागे घेतली. गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या शोरूमवर हल्ला झाल्याची माहिती खोटी असून गांधीधाममध्ये तनिष्क स्टोअरमध्ये दोघेजण आले आणि त्यांनी मॅनेजरला गुजरातीतून माफी मागण्यास सांगितली. दुकान मालकाने मागणी पूर्ण केली आणि माफी मागितली. मात्र, दुकानात अजूनही धमकीचे कॉल येत असल्याची माहिती कच्छ (पूर्व) चे पोलीस अधीक्षक मयूर पाटील यांनी दिली.
गुजरातमधील कच्छ येथील गांधीधाम परिसरातील तनिष्क स्टोअरचा मॅनेजर राहुल मनुजा यांनी सांगितले की, स्टोअरवर हल्ला नाही झाला. मात्र, धमकीचे कॉल येत आहेत. पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत. “तनिष्कने जाहीरात प्रदर्शित करुन, हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कच्छ जिल्ह्यातील तनिष्क शोरूममध्ये असा प्रकार घडला.
The store has not been attacked. However, I received some threat calls. The police have supported us: Rahul Manuja, manager of Tanishq store in Gandhidham, Kutch in Gujarat https://t.co/IWTpQCbTs1pic.twitter.com/nD0lznJPX8
— ANI (@ANI) October 14, 2020
तनिष्कच्या जाहिरातीत काय होतं ?
हिंदू सुनेचे डोहाळे जेवण तिचे मुस्लीम सासू-सासरे करीत असल्याचे दाखविणारी ही जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप अत्यंत तीव्रतेने झाल्याने ‘तनिष्क’ने आपली जाहिरात मागे घेतली. ४५ सेकंदाची ही जाहिरात प्रसारित झाली होती. मुस्लीम सासू सासऱ्यांकडून मुलीसारखे प्रेम मिळणाऱ्या हिंदूू सुनेच्या डोहाळे जेवणाच्या सोहळ्याविषयी सांगणाऱ्या जाहिरातीत या कुटुंबात दोन भिन्न धर्म, संस्कृती, परंपरांचे मीलन झाल्याचे मांडण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि कित्येक मान्यवरांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देत असल्याबद्दल या जाहिरातीचे प्रचंड कौतुक केले. मात्र, भाजप नेत्या कोतापल्ली गीता यांनी त्यावर ट्विटरद्वारे टीका केली. समाज माध्यमांवर ही जाहिरात लव्ह जिहादचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या कटू वादानंतर तनिष्कने ही जाहिरात सोशल मीडियावरून मागे घेतली.