ऑनलाइन दिला टास्क; ५९ लाखांची फसवणूक, तरुणीला दाखविले पैशाचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:51 AM2024-01-15T11:51:19+5:302024-01-15T11:51:33+5:30
भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील सरस्वती सदनमध्ये राहणाऱ्या निकिता दिगंबर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री अनोळखी सायबर लुटारूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरारोड : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाणे हद्दीतील सायबर लुटारूंनी टेलिग्रामद्वारे संपर्क करून ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवून पाच जणांची तब्बल ५९ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यापैकी भाईंदरच्या एका तरुणीचे सुमारे ४० लाख, तर एका व्यक्तीचे १२ लाख आहेत.
भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील सरस्वती सदनमध्ये राहणाऱ्या निकिता दिगंबर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री अनोळखी सायबर लुटारूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी व्यक्तीने टेलिग्रामद्वारे संपर्क करत ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास घरबसल्या चांगली कमाई होईल, असे आमिष दाखविले. पार्ट टाइम जॉब असल्याने चव्हाण यासह हितेश बाबरिया व अन्य तिघांनी ऑनलाइन टास्क पूर्ण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काम केल्याचे काही पैसे देण्यात आले.
आणखी पैसे भरण्याची मागणी झाली आणि...
टास्क म्हणून गुंतविलेले पैसे परत मिळण्यासाठी आणखी पैसे भरण्याची मागणी होऊ लागली. नंतर पैसे मिळाले नाहीत म्हणून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
निकिता चव्हाण यांची सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. हितेश बाबरिया यांना सुमारे १२ लाखांना फसविले आहे. याशिवाय, अन्य तिघांची सुद्धा फसवणूक केली.
पोलिसांनी पाच जणांच्या फसवणुकीचा एकत्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय केदारे करीत आहेत.