टीसीने ट्रॅकमनच्या मुलीचा हात पिरगळला; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 08:58 PM2019-10-29T20:58:49+5:302019-10-29T21:04:00+5:30
पोलीस टीसीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पीडित मुलीच्या कुटुबियांकडून केला जात आहे.
मुंबई - एका ट्रॅकमनची मुलगी रेल्वेने प्रवास करत असताना तिकीटांची तपासणी करायला आलेल्या टीसीने त्या मुलीचा हात पिरगळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टीसीने त्या मुलीच्या हातातील वडिलांचे रेल्वे मेडीकल कार्डही हिसकावून घेतल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. ही मुलगी रेल्वेच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करण्याऐवजी फर्स्ट क्लासने प्रवास करत होती. तरी देखील टीसीने मुलीचे हात पिरगळणे बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. या घटनेप्रकरणी अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी टीसीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलीस टीसीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पीडित मुलीच्या कुटुबियांकडून केला जात आहे.
काजल जैसवाल असे या पीडित तरुणीचे नाव आहे. काजलने दिलेल्या माहितीनुसार, ती २० ऑक्टोबर २०१९ रोजी आपल्या मैत्रीणीसोबत खरेदीसाठी लोअर परळ येथून जोगेश्वरीला लोकल ट्रेनने जात होती. तिने लोअर परळ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरून बोरिवली धीमी गाडी पकडली. मात्र, लोकलच्या डब्ब्यात गर्दी जास्त होती. याशिवाय प्रवासात आपल्या मैत्रिणीची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती तिने दिली. मैत्रिणीला चक्कर येऊ लागले. तिला खूप त्रास होऊ लागल्याने काजलने खार रोड रेल्वे स्टेशन येथे उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर खार रोड रेल्वे स्थानकावर दुसरी लोकल ट्रेन आली. मात्र त्या ट्रेनमध्ये सुध्दा गर्दी असल्यामुळे काजल लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यात बसली.
सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर लोकल येताच त्या डब्यात टीसी आले. त्यांनी काजलला तिकिटाची विचारपूस केली. तेव्हा काजलने आपले वडील रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती देत वडिलांचे रेल्वे मेडिकल कार्ड दाखवले. परंतु, प्रथम वर्गाच्या डब्यामध्ये बसल्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागेल’, असे सांगून टिसीने विलेपार्ले रेल्वे स्टेशन या तिघींना उतरवले आणि स्टेशन मास्तरच्या ऑफिसच्या बाजूला असलेल्या एका ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिथे त्याने दंडाची मागणी केली. ‘आम्हाला तिघांना तिथे बराच वेळ थांबवून ठेवले गेले. मैत्रिणीची तब्येत ठीक नसल्यामुळे तुम्ही दंड घ्या, पण आम्हाला लवकर जाऊ द्या. अशी विनंती मी वारंवार टीसीला केली. मात्र, त्यावर टीसीने वाद घालता’, असे काजलने सांगितले. काजलने दंड भरला, मात्र तिच्या हाताला दुखापत झाली.
काजलच्या वडिलांना टीसीकडून शिवीगाळ
काजलने दिलेल्या माहितीनुसार, टीसीने काजलकडून तिच्या वडीलांचे रेल्वे मेडिकल कार्ड काढून घेतले होते. कार्ड फाडून टाकतो, अशी धमकी टीसी देत होता. तेव्हा काजलने रेल्वे मेडिकल कार्ड टीसीकडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, टीसीने काजलच्या डाव्या हाताचा अंगठा हाताने जोरात मागच्या बाजूस वाकवून कार्ड हिसकावून घेतले. त्यामुळे काजलच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली. यासोबतच तिच्या वडिलांना शिवीगाळ केली. या वर्तणुकीमुळे काजलने जीआरपी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र अद्याप पोलिसांनी टीसीवर गुन्हा दाखल करण्याशिवाय कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे टिसीला वाचविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप काजलच्या कुटुबियांकडून करण्यात येत आहे.