तब्बल २ वर्ष महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याला घरी लपवून ठेवलं; कुटुंबाला बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 10:49 AM2022-10-26T10:49:14+5:302022-10-26T10:50:38+5:30
मुलगा ज्या महिला शिक्षिकेच्या घरी लपला होता ती त्याच्या गर्लफ्रेंडची आई होती.
घर सोडून गेलेल्या एका विद्यार्थ्याला तब्बल २ वर्ष महिला शिक्षिकेने घरात लपवून ठेवले. या मुलाचं घर शिक्षिकेच्या घरापासून ३२ किमी अंतरावर होते. मात्र २ वर्ष कुणालाही साधी भनकही लागली नाही. हा विद्यार्थी लपून शिक्षिकेच्या घरात राहत होता. अचानक मुलगा घरातून गायब झाल्याने कुटुंबाला शॉक बसला. नातेवाईक त्रस्त झाले होते. पोलिसांनाही मुलाला शोधण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागले तरीही मुलाचा शोध लागला नाही.
मुलगा ज्या महिला शिक्षिकेच्या घरी लपला होता ती त्याच्या गर्लफ्रेंडची आई होती. ६१ वर्षीय शिक्षिका होल्गा कॅस्टिलो ओलिवारेस कॅलिफोर्नियात राहते. त्यांनी मायकल रमीरेज नावाच्या विद्यार्थ्याला घरात लपवून ठेवले होते. रमीरेज जेव्हा घरातून पळाला होता तेव्हा त्याचे वय अवघे १५ वर्ष होते. तो काका-काकीसोबत घरात राहायचा. काका-काकीच्या जाचामुळे तो खूप वैतागला होता. मायकलच्या काकाने ९ जून २०२० रोजी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.
मायकल गायब झाल्यानंतर काका-काकी चिंतेत होते. परंतु २ वर्ष मायकल हा महिला शिक्षिका आणि तिच्या कुटुंबासोबत राहत होता. पोलीस त्याचा सगळीकडे शोध घेत होती. पोलिसांनी अनेक ठिकाणी मायकलला शोधलं. परंतु प्रयत्न अयशस्वी ठरले. पोलिसांनी शिक्षिकेला विचारणा केली परंतु मायकलबाबत काहीच माहिती नाही असं तिने पोलिसांना सांगितले. यावर्षी मार्चमध्ये अचानक मायकल त्याच्या काका-काकीकडे परतला. मायकलला सुखरुप पाहून ते खुश होते. परंतु अखेर २ वर्ष तो कुठे होता हाच सवाल त्यांच्या मनाला पडला होता.
काकी म्हणाली की, माझ्याकडे शब्द नाहीत. मुलगा गायब झाल्याने काय वाटतं हे सांगू शकत नाही. तुम्हाला खूप वाईट विचार येतात. कुणीतरी आपल्याला लुटलंय असा विचार येतो असं त्यांनी सांगितले. ज्या शिक्षिकेने मायकलला लपवून ठेवले होते ती ८ वीच्या वर्गात शिकवते. ती शाळेची कर्मचारी असून सध्या सुट्टीवर आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी मायकलच्या काका-काकींनी पोलिसांना केली आहे.