जमिनीच्या वादातून शिक्षकाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 10:31 AM2020-10-16T10:31:16+5:302020-10-16T10:34:00+5:30
Crime News, Akola मोहम्मद उमेर आणि मोहम्मद जुबेर या दोघांनी शिक्षकावर धारदार शस्त्रांनी कान्हेरी सरपनजीक प्राणघातक हल्ला केला.
अकोला : बार्शीटाकळी येथील रहिवासी तथा व्यवसायाने शिक्षक असलेल्या जुबेर अहमद खान शफाकत उल्ला खान यांच्यावर फिरदोस कॉलनी येथील दोन युवकांनी धारदार शस्त्राने कान्हेरीनजीक गुरुवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला असून, सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बार्शीटाकळी येथील रहिवासी तथा शिक्षक जुबेर अहेमद खान शफाखत उल्ला खान यांच्याशी प्लॉट खरेदीच्या कारणावरून फिरदोस कॉलनी येथील रहिवासी मोहम्मद हारून अब्दुल रहेमान यांचे मुले मोहम्मद जुबेर व दुसरा मुलगा मोहम्मद उमेर यांचा वाद सुरू आहे. याच वादातून गुरुवारी सायंकाळी मोहम्मद हरून अब्दुल रहमान यांचा मुलगा मोहम्मद उमेर आणि मोहम्मद जुबेर या दोघांनी शिक्षकावर धारदार शस्त्रांनी कान्हेरी सरपनजीक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षक जुबेर अहमद खान यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी शिक्षकावर उपचार सुरू असतानाच त्यांचा रात्री आठ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात सदर दोन युवकांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच बार्शीटाकळी व खदान पोलिसांनी हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.