वर्गात पंख लावल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:05 PM2019-01-04T18:05:58+5:302019-01-04T18:07:30+5:30
याप्रकरणी लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी विद्यालयातील शिक्षक महेश राऊतच्या विरोधात केळवे पोलीस ठाण्यात गुुन्ह दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
हितेन नाईक
पालघर - शाळेतील छतावरील पंखा लावण्याच्या शुल्लक कारणावरून नववी इयत्तेतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या डोळ्याला मार लागला आहे. याप्रकरणी लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी विद्यालयातील शिक्षक महेश राऊतच्या विरोधात केळवे पोलीस ठाण्यात गुुन्ह दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सफाळे- वेढी येथील गणेश मोरेश्वर लोहार हा आदिवासी समाजातील मुलगा वरील शाळेत इयत्ता 9 वी इयत्तेत शिकत असून 24 डिसेंबर रोजी सकाळी वर्ग भरल्यानंतर वर्गात पंखा कुणी लावला याचा जाब विचारला. सरांचा चढलेला पारा पाहता एकही विद्यार्थी पुढे येईना. अनेक वेळा विचारूनही कुणी उत्तर देत नसल्याने संतप्त झालेल्या महेश राऊत या शिक्षकाने इलेकट्रीक बोर्डाच्या खाली बसलेल्या गणेश लोहारला समोर बोलावले. त्याला याबाबत जाब विचारल्यानंतर मी पंखा लावला नसल्याचे सांगूनही राऊत या शिक्षकाने गणेशला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत त्याचा उजवा डोळा सुजून पूर्ण लाल-काळा पडला आहे.
शाळा सुटल्यानंतर घरी परत आल्यावर प्रचंड दडपणाखाली आलेला गणेश एका कोपऱ्यात पडून राहिला होता.मजुरीचे कामावरून संध्याकाळी घरी परतलेल्या आई वडिलांने त्याला सुजलेल्या डोळ्याबाबत विचारले असता त्याने काहीही कारण न देता पडून राहिला. सतत 7 दिवस गणेश शाळेत न आल्याने त्याचे काही मित्र त्याला पाहण्यासाठी घरी गेले. त्यावेळी गणेशच्या आईने त्याच्या मित्रांकडे विचारपूस केल्यानंतर सर्व हकीकत कळली. त्यानंतर आई-वडिलांना प्रचंड धक्का बसला. गणेशच्या डोळ्यातून हळूहळू रक्त येत त्याला अस्पष्ट दिसू लागल्याने त्याच्या आईने सरळ शाळेत जाऊन शिक्षकाला जाब विचारला. आपण मुलाला मारहाण केल्याचे कबुल करून त्याचा सर्व वैद्यकीय खर्च करायला मी तयार आहे. पण हे प्रकरण पुढे नेऊ नका अशी विनवणी पालकांना केली. त्यामुळे सागर सुतार या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पालकांनी सरळ केळवे पोलीस स्टेशन गाठले. गणेशचे वडील आणि आई गरीब असून मोजमजुरी करून आपल्या मुलाने उच्चशिक्षण घ्यावे म्हणून झटत आहेत. शुल्लक गोष्टीतून डोळा जायबंदी होईस्तोवर मुलाला मारहाण करण्यात आल्याने त्याने शिक्षकाचा धसका घेतला असल्याने तो शाळेत जायला घाबरत आहे. आपल्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होण्याची वेळ उद्भवली असून केळवे पोलिसांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी त्यांच्या पालकांनी केली आहे.
मारहाण केलेल्या गणेश लोहार या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया
मला मारहाण केल्यावर माझा डोळा सुजल्यानंतर तू कुठे तरी पडला मी मारल्याचे सांगितले तर बघून घेईन अशी धमकी सरांनी दिली.