धक्कादायक ! सातवीतील विद्यार्थिनींना शिक्षकाने दाखविली अश्लील चित्रफीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 03:16 PM2020-02-04T15:16:36+5:302020-02-04T15:18:53+5:30

सिडकोतील खाजगी शाळेत १५ दिवसांपूर्वी झाली घटना 

teacher shown porn video to school girls in aurangabad | धक्कादायक ! सातवीतील विद्यार्थिनींना शिक्षकाने दाखविली अश्लील चित्रफीत

धक्कादायक ! सातवीतील विद्यार्थिनींना शिक्षकाने दाखविली अश्लील चित्रफीत

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांना पत्राद्वारे मिळाली माहिती मुख्याध्यापकांना बाहेर ठेवून दामिनी पथकाने केली चौकशी

औरंगाबाद : इयत्ता सातवीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींना शिक्षकानेच अश्लील क्लीप दाखविल्याच्या घृणास्पद प्रकाराचा विद्यार्थिनीच्या काकाने पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून भंडाफोड केला. पत्र प्राप्त होताच दामिनी पथकाने शाळेत आणि मुलींच्या घरी जाऊन या घटनेबाबत विचारपूस केली तेव्हा महिला अधिकाऱ्यांसमोर मुलींना रडू कोसळले. पोलीस ठाण्यात आल्यानंतरही तक्रार नोंदविण्यास पालकांनी असमर्थता दर्शविली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा नोंदविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिडको एन-७ मधील नामवंत शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींना शिक्षकानेच अश्लील क्लीप दाखविल्याची माहिती तेथील शिक्षिकांना विद्यार्थिनींकडून समजली होती. मात्र, ज्या शिक्षकाने हा प्रकार केला तो मुख्याध्यापकाच्या जवळचा नातेवाईक आहे. याविषयी तक्रार केल्यास नोकरी धोक्यात येईल, या भीतीपोटी तेथील शिक्षिका आणि शिक्षकांनी याची वाच्यता करणे टाळले. मात्र, त्या शिक्षकावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सर्वांची होती. हा प्रकार मुख्याध्यापकाच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी नातेवाईक आरोपी शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी त्यांची बदली सकाळच्या सत्रातून दुपारच्या सत्रात केली.  

मुख्याध्यापकांना बाहेर ठेवून दामिनी पथकाने केली चौकशी
दरम्यान, पीडित विद्यार्थिनीचे नाव असलेला एक अर्ज पोलीस आयुक्तांना काही दिवसांपूर्वी प्राप्त झाला होता. दामिनी पथकाकडे हा अर्ज चौकशीसाठी आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गत शुक्रवारी शाळेत गेले. तोपर्यंत सातवीचा वर्ग असलेल्या सकाळच्या सत्रातील शाळा सुटली होती. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पथक पुन्हा शाळेत गेले आणि त्यांनी सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर मुख्याध्यापकांना वर्गाबाहेर जाण्यास सांगून पथक सातवीतील मुलींना भेटले. तेव्हा राजपूत नावाच्या एका शिक्षकाची नुकतीच बदली करण्यात आल्याचे मुलींनी सांगितले. तीन विद्यार्थिनींना त्याने अश्लील व्हिडिओ क्लीप दाखविल्याचे दोन्ही मुलींनी सांगितले. तिसरी मुलगी शनिवारी शाळेत आली नव्हती. यामुळे दोन्ही मुलींना सोबत घेऊन पथक तिसऱ्या विद्यार्थिनीच्या घरी गेले. तेथे त्या मुलीने आई-वडिलांसमोर रडतच शिक्षकाने अश्लील क्लीप दाखविल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकारानंतर पालक आणि पीडित विद्यार्थिनींचे जबाब नोंदविण्यात आले. दामिनी पथकाने सिडको पोलिसांना अहवाल देऊन कारवाई करण्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी आरोपी शिक्षकाविरुद्ध आम्ही फिर्याद देतो, असे म्हणाऱ्या पालकांनी सोमवारी मात्र तक्रार देण्यास नकार दिल्याचे सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले.

Web Title: teacher shown porn video to school girls in aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.