टिचिंग ते इव्हेन्ट मॅनेजमेंट; गोव्याच्या चमकदमकमुळे रिना होती चकाचौंध
By नरेश डोंगरे | Published: September 3, 2022 10:13 PM2022-09-03T22:13:44+5:302022-09-03T22:14:17+5:30
रिना प्रारंभी मोतीरामानीसोबत शिक्षिका म्हणून काम करायची. नोकरी सोडून ती गोव्याला गेली.
नागपूर - गोव्यातील मायावी वातावरणामुळे झपाटलेल्या रिनाला चकमदमकची सवय झाली होती. त्यासाठी तिला पैशाची वारंवार गरज पडायची. त्याचमुळे रिना स्वताच्या ‘एक्स’चे अपहरण करण्याच्या कटात सहभागी झाली. मुख्याध्यापक प्रदीप मोतीरामानीच्या अपहरणकांडात अटक केल्यानंतर प्राथमिक चौकशीतच अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. त्यातीलच उघड झालेला हा एक पैलू आहे.
रिना प्रारंभी मोतीरामानीसोबत शिक्षिका म्हणून काम करायची. नोकरी सोडून ती गोव्याला गेली. तेथे मोठमोठ्या इव्हेन्टमध्ये ती छोटीमोठी जबाबदारी पार पाडत होती. स्टार इव्हेन्ट आणि त्यातील चमकदमक पाहून रिना पुरती त्या वातावरणात रमली. रिनाचे वडिल निवृत्त पोलीस कर्मचारी होते. त्यांच्या निधनामुळे रिना नागपुरात परतली मात्र इव्हेन्टची चमकदमक तिला स्वस्थ बसू देत नव्हती. ती इव्हेन्ट मॅनेजर म्हणूनच येथे वावरत होती. मात्र, फारसे काम हाती नसल्याने आणि पैशाची चणचण असल्याने तिने घटस्फोटित पतीशी पॅचअप केले अन् कथित ‘एक्स’च्या अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी झाली.
फेसबूकवरची ओळख भोवली
या प्रकरणातील आरोपी सूरज फलके याची गेल्या महिन्यात आरोपी नोएल फ्रान्सिसोबत ओळख झाली. ड्रायव्हरचा जॉब देतो म्हणून नोएलने त्याला नागपुरात बोलवून स्वतासोबत ठेवले अन् अपहरणाच्या गुन्ह्यात सूरज गोवला गेला. दुसरा आरोपी जॉय हासुद्धा पेंटींग, डेकोरेशनचे काम मिळणार या आशेने फ्रान्सिससोबत जुळला होता.
३० लाखांची आयडिया
मोतीरामानी हा एका बड्या व्यक्तीच्या वादग्रस्त प्रकरणातील मोठा दुवा आहे. त्या प्रकरणात त्याला लाखोंची रक्कम मिळणार असल्याची माहिती आरोपींना कळली होती. त्याचमुळे त्याचे अपहरण करून ३० लाख रुपये उकळण्याची आयडिया आरोपींनी लढवली. मात्र, त्यांचा डाव फसला अन् आरोपी पोलिसांच्या तावडीत अडकले.