शिकवणी घ्यायला आली अन् चोरी करून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:42 AM2020-02-07T00:42:10+5:302020-02-07T00:43:17+5:30
मुलीची शिकवणी घ्यायला आलेल्या एका महिलेने संधी साधून घरातील दीड लाखांचे दागिने चोरून नेले. १४ डिसेंबर २०१९ ला घडलेल्या या घटनेची तक्रार बुधवारी अजनी ठाण्यात दाखल करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलीची शिकवणी घ्यायला आलेल्या एका महिलेने संधी साधून घरातील दीड लाखांचे दागिने चोरून नेले. १४ डिसेंबर २०१९ ला घडलेल्या या घटनेची तक्रार बुधवारी अजनी ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी आरोपी काजल तायडे (वय ३३, रा. मानेवाडा) हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
अर्चना देवेंद्र पठाडे (वय ३३) या मानेवाडा चौकाजवळच्या विणकर कॉलनीत राहतात. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांचे पती वकिली करतात. गेल्या वर्षी त्यांच्या मुलीला शिकविण्यासाठी काजल तायडे होम ट्यूटर म्हणून पठाडे यांच्याकडे येत होती. १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ती नेहमीप्रमाणे पठाडे यांच्याकडे आली. पठाडे बाथरूममध्ये असल्याची संधी साधून तिने चिमुकलीला चॉकलेट आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पाठविले आणि स्वत: किचनमध्ये शिरली. तेथे आलमारीच्या लॉकरमध्ये असलेले १ लाख ३४,५०० रुपयांचे दागिने काजलने चोरले. मुलगी बाहेरून चॉकलेट घेऊन आली तर पठाडे बाथरूममधून आल्या तेव्हा काजल तेथून निघून गेली. घरात चोरी झाल्याचे लक्षात येऊनही पठाडे दाम्पत्याला तायडेवर संशय आला नाही. शिक्षिका असल्याने ती चोरी करूच शकत नाही, असा त्यांचा समज होता. तो खोटा ठरला. मात्र, तायडेला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे कळाल्यानंतर पठाडे यांनी तेथे जाऊन बघितले तेव्हा त्यांना चांगलाच धक्का बसला. ती चोरटी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पठाडे यांनी बुधवारी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक उपनिरीक्षक आर. जे. पाटील यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.