रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौकशी सुरु
By पूनम अपराज | Published: January 4, 2021 05:20 PM2021-01-04T17:20:46+5:302021-01-04T17:21:31+5:30
Income Tax :सूत्रांनी सांगितले आहे की, बीकानेर आणि फरीदाबाद जमीन घोटाळ्याप्रकरणी आयकर विभाग रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करत आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात, आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रा यांना नोटीस पाठविली होती, परंतु ते आयकर कार्यालयात पोहोचले नाही. यानंतर आयकर अधिकारी अधिकारी थेट रॉबर्ट वाड्रा यांच्या कार्यालयात पोहोचले आणि वाड्रा यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे.
आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट वाड्रा यांचा जबाब दक्षिण पूर्व दिल्लीतील सुखदेव विहार कार्यालयात नोंदवले जात आहे. सूत्रांनी सांगितले आहे की, बीकानेर आणि फरीदाबाद जमीन घोटाळ्याप्रकरणी आयकर विभाग रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करत आहे.
आरोपांनुसार रॉबर्ट वाड्रा यांच्या फर्म सनलाइट हॉस्पिटॅलिटीने राजस्थानमधील बीकानेरमध्ये जमीन घोटाळा केला आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, वाड्रा यांच्या मालकीच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने ६९.५५ हेक्टर जमीन ७२ लाख रुपयांना विकत घेतली आणि नंतर एलेगेनी फिनलेज़ ला ५. १५ कोटी रुपयांना विकली. म्हणजेच ४. ४३कोटी रुपयांचा नफा झाला.
Income Tax Department is recording the statement of Robert Vadra in connection with Benami Property Case: Sources
— ANI (@ANI) January 4, 2021
(file pic) pic.twitter.com/S5T7pVGq8S
रॉबर्ट वाड्रा हे कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आहेत आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशी त्यांचे लग्न झाले आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे रॉबर्ट वाड्रा आयकर विभागाच्या चौकशीसाठी सहभागी होऊ शकले नसल्याचे सांगितले जात आहे. आयकर व्यतिरिक्त, अंमलबजावणी विभाग (ईडी) रॉबर्ट वाड्राविरूद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे.
लंडनस्थित मालमत्ता खरेदीसाठी रॉबर्ट वाड्रावर मनी लाँडरिंगचा आरोप आहे. ब्रायनस्टन स्क्वेअरमध्ये 1.9 दशलक्ष पाउंड किंमतीचे घर विकल्याचा आरोप वाड्रा यांच्यावर आहे. रॉबर्ट वाड्रा सध्या अटकपूर्व जामिनावर आहे.