घोडबंदर रोडवर अपघात; आयटी कंपनीतील टीम लीडर जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 09:52 AM2022-03-11T09:52:06+5:302022-03-11T09:52:18+5:30
टेम्पोचालकास अटक : घोडबंदर रोडवरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाघबीळ नाका येथे घोडबंदर रोडहून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर दुचाकीवरून घरी जाणाऱ्या एका खासगी आयटी कंपनीतील टीम लीडर सेंचेज पिकॉक (२८, रा. नेट को-ऑप. सोसायटी, धोबीआळी, ठाणे) याचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी टेम्पोचालक टुनटुन डांगरराम पाल (२६, रा. पडघा, भिवंडी, ठाणे) याला अटक केल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
पिकॉक हे रात्रपाळीवरून आपल्या कंपनीतून घोडबंदर रोडने दुचाकीवरून धोबीआळीतील आपल्या घरी जात होते. गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास वाघबीळ नाका येथे त्यांच्या पाठीमागून आलेल्या टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीवरून ते खाली कोसळले. यात डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने कासारवडवली पोलिसांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्यांना दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. भरघाव टेम्पो चालविल्याबद्दल रामपाल याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र फड आणि जे. एस. व्हनमाने यांनी रामपालला अटक केली.
कुटुंबासह कंपनीत हळहळ
सेंचेज हा कासारवडवली येथील घोडबंदर रोडवरील जी कॉर्प टेक पार्क या आयटी कंपनीत टीम लीडर होता. गुरुवारी रात्रपाळी संपवून तो घरी जात असतानाच त्याच्या दुचाकीला टेम्पोची धडक बसली. यात त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांसह कंपनीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.