दहा अधिकाऱ्यांचे पथक करणार परमबीर सिंग यांची चौकशी, अविनाश अंबुरे यांच्याकडे धुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:39 AM2021-08-06T10:39:52+5:302021-08-06T10:40:09+5:30
Param bir Singh: या संपूर्ण प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या आरोपांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. यामुळे परमबीर सिंग यांच्यापुढील अडचणी आणखी वाढणार आहेत.
ठाणे : बांधकाम व्यावसायिक केतन तन्रा आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल केलेल्या खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली दहा अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी गुरुवारी केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या आरोपांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. यामुळे परमबीर सिंग यांच्यापुढील अडचणी आणखी वाढणार आहेत.
मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त दीपक देवराज, एन्काउंटर स्पेशालिस्ट निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, कथित पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता बिनू वर्गीस यांच्यासह २८ आरोपींविरुद्ध केतन तन्ना आणि सोनू जालान यांनी हा खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खंडणी, पैसे वसुलीसाठी धमकावणे, अशी गंभीर कलमे या गुन्ह्यांमध्ये आहेत. एरव्ही, एखादा पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून अशा गुन्ह्यांचा तपास होतो. मात्र, यात अडकलेले पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह अनेक बड्या अधिकाऱ्यांचा, तसेच खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. त्यांच्यावर झालेले आरोपही गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यासाठी स्थापन करण्यात आले पथक
अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठीही एक-दोन नव्हे, तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमचीच आवश्यकता असल्याचा अभिप्राय काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे नोंदविला होता. याची दखल घेऊन पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या अधिपत्याखाली पाच अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली एसआयटी तपास करणार आहे. या टीमला गरज पडली तर इतरही पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी मदत करायची असल्याचे आयुक्तांनी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.