शेरू’च्या निरोप समारंभात पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 04:46 PM2019-04-02T16:46:20+5:302019-04-02T16:47:52+5:30
सॅल्यूट देत मोठ्या थाटामाटात पार पडला शेरूचा निरोप समारंभ
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी - दहा वर्षानंतर ‘तो’ निवृत्त होणार होता, त्यामुळे त्याच्या निवृत्तीची जय्यत तयारी सुरू होती. त्याच्यासाठी खास फुलांनी गाडी सजविण्यात आली. ‘तो’ दिमाखात चालत आला आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला ‘सॅल्यूट’ दिला. त्यानंतर त्याच्या पाठीवर मायेची शाल पांघरण्यात आली आणि त्याचा सांभाळ करणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. हा निरोप समारंभ कोणा व्यक्तीचा नव्हे तर चक्क ‘शेरू’ या श्वानाचा होता.
रत्नागिरीतील पोलीस दलातील बॉम्ब शोध व नाश पथकात १८ मार्च २००९ रोजी ‘शेरू’ हे श्वान दाखल झाले. त्यानंतर त्याच्या कामाला सुरूवात झाली. पोलीस दलात सहभागी झालेल्या ‘शेरू’ने आपल्या कामाचा ठसा उमटविण्यास सुरूवात केली. गेली दहा वर्ष मंगेश नाखरेकर आणि रणजित जाधव हे ‘हॅण्डलर’ म्हणून काम करत होते. सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १०.२० वाजेपर्यंत त्याच्या नित्यक्रमात कधीच खंड पडलेला नाही.
रविवारी ‘शेरू’ आपल्या सेवेतून निवृत्त झाला. त्याच्या निवृत्तीसाठी खास गाडी सजविण्यात आली होती. सर्व कर्मचारी ही गाडी सजविण्याच्या कामात गुंतलेले होते. तो आल्यानंतर इतर श्वानांनी त्याला सलामी दिली. त्यानंतर तेथील महापुरूषाच्या मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर राऊत यांनी त्यांच्या पाठीवर शाल घालून त्याचा सन्मान केला. यावेळी मंगेश नाखरेकर आणि रणजित जाधव यांनी इतर श्वानांसाठी भेटवस्तू दिली. तर कर्मचाऱ्यांतर्फे दोघांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा पार पडल्यानंतर सजविलेल्या गाडीत ‘शेरू’ला बसवून ती गाडी कर्मचारी ओढत घेऊन गेटपर्यंत गेले. त्यानंतर आपल्या लाडक्या ‘शेरू’ला सर्वांनी निरोप दिला. या निरोपावेळी त्याचा सांभाळ करणाऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून आले होते.