अन् तरळले आनंदाश्रू ! ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांनी वाढदिवस साजरा करून दिले सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 08:18 PM2020-05-02T20:18:41+5:302020-05-02T20:22:29+5:30
नागपुरात मात्र, असे काही घटकेचे का होईना सौख्य गुरुवारी आणि शुक्रवारी चौघांना लाभले.
नरेश डोंगरे
नागपूर : वृद्धत्व आणि आजाराने त्रस्त झालेल्या ज्येष्ठांच्या घरी ध्यानीमनी नसताना पोलीस पोहचतात. त्यांचा वाढदिवस साजरा करतात, त्यांना मिठाई खाऊ घालतात तसेच भेटवस्तूही देतात. आयुष्याच्या सायंकाळी पोलिसांकडून अशी सुखद भेट सिनेमात बघायला मिळते. नागपुरात मात्र, असे काही घटकेचे का होईना सौख्य गुरुवारी आणि शुक्रवारी चौघांना लाभले.
घनश्याम बळीराम कुंभारकर (वय ८३) हे जय हिंद नगर मानकापूर येथे राहतात. त्यांच्याकडे भरोसा सेलमधील पोलीस पथक ३०एप्रिलच्या दुपारी पोहोचले. अचानक पोलीस ताफा आल्याचे पाहून कुंभारकर, त्यांचे नातेवाईक आणि शेजारीही काहीसे घाबरले कशाला आले असावे पोलीस, असा प्रश्न त्यांना पडला. तिकडे कुजबुज सुरू झाली असतानाच पोलिसांनी मात्र थेट कुंभारकरांना गाठून त्यांची वास्तपुस्त केली. आम्ही भरोसा सेल मधील पोलीस असून तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो, असे पोलिसांनी सांगितले. ते ऐकून काही क्षण कुणाचाच विश्वास त्यांच्यावर बसला नाही. मात्र पोलिसांनी सोबत आणलेली मिठाई आणि भेटवस्तू कुंभारकर यांना दिली आणि 'हॅपी बर्थ डे टू यू', असे गीत गाऊन टाळ्यांचा ठेकाही धरला या अत्यंत सुखद अशा धक्क्यामुळे वृद्ध कुंभारकर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी पोलिसांना थरथरत्या शब्दांनी धन्यवाद दिले. त्यानंतर काय हवे काय नको अशी विचारणा करून पोलिसांनी कुंभारकर यांचा निरोप घेतला.
लॉकडाऊनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेले ७४ विद्यार्थी शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल
सांगा कसं जगायचं,कण्हत कण्हत की गाणं म्हणत..! सेवा निवृत्त 'त्या' पोलिसाचे बोल
भरतनगर अंबाझरीत मंदाकिनी खुशालराव गेडाम (वय ८१) राहतात. त्या अर्धांगवायुने ग्रस्त आहेत. वृद्धत्व आणि त्यात असा आजार त्यामुळे त्या अंथरुणाला खिळल्या आहेत. ३० एप्रिलला त्यांचाही वाढदिवस!
मात्र, साजरा कोण करणार?त्यात लॉकडाऊनमुळे सारेच कसे जड झालेले. एकमेकांसोबत भेटण्या बोलण्याचीही भीती वाटावी, असे दिवस. त्यामुळे अंथरुणावर खिळलेल्या वृद्धेचा वाढदिवस वगैरे साजरा करण्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही.
मात्र, भरोसा सेलचे पथक मंदाकिनी आजींकडे पोहचले अन आजींचा वाढदिवस साजराही केला.
विठ्ठलवाडी हुडकेश्वर मधील रेणुका माता मंदिराजवळ राहणाऱ्या भागवत महादेवराव नेवारे (वय ७२) आणि न्यू मनीष नगरातील जीवन अक्षर सोसायटीतील प्रकाश हरिभाऊ दांडेकर (वय ६५) यांचाही वाढदिवस १ मे रोजी पोलिसांनी असाच साजरा केला. आणखी किती दिवस आयुष्य जगायचे, असा स्वत:च स्वतःला प्रश्न विचारनाऱ्या या वृद्धांसाठी हा वाढदिवस त्यांच्या आयुष्यातील संचितच ठरले आहे.
पोलिसांच्या रेकॉर्ड वर उपराजधानीत साडेपाच हजार एकाकी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातील काहींचे नातेवाईक दुसरीकडे तर काहींची मुले विदेशात राहतात. काहींना नातेवाईकच नाहीत. अशा सर्वांवर लक्ष ठेवून, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी भरोसा सेल च्या पोलिसांवर सोपविली आहे. लॉकडाऊनमुळे अशा वृद्धांच्या समस्येत आणखीच भर पडली आहे. आरोग्य, औषध, खाण्यापिण्याच्या गरजा भागविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत, किरकोळ गरजा भागविण्यासाठीही बाहेर निघू शकत नसल्याने जगणे जड झाले आहे. अशा कठीण दिवसात पोलिसांकडून मिळालेला भरोसा या सर्वांचे जगणे पल्लवित करून गेला आहे.