बनावट नोटा छापण्याचे तंत्र पुण्याच्या मित्राकडून एक लाखात घेतले; कमिशनवर तत्वावर व्हायचा व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 12:31 PM2020-12-11T12:31:03+5:302020-12-11T12:34:50+5:30
आरोपी त्रिकुटाकडून सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि अन्य साहित्य जप्त
औरंगाबाद : बनावट नोटा प्रकरणात सिडको पोलिसांनी धारूर (जि. बीड) येथून पकडून आणलेला आरोपी आकाश संपत्ती माने पुण्यातील मित्राकडून नोटा छापण्याचे तंत्रज्ञान एक लाखात खरेदी केल्याचे समोर आले. न्यायालयाने गुरुवारी आकाशला दि.१४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
टीव्ही सेंटर येथे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या संदीप श्रीमंत अरगडे आणि निखिल बाबासाहेब संभेराव या दोघांना सिडको पोलिसांनी ८ डिसेंबर रोजी रात्री अटक केली. चौकशीत आरोपी आकाश मानेचे नाव समोर आले. पोलिसांनी धारूर येथे जाऊन आरोपी मानेला बुधवारी अटक करून आणले. मानेने स्वतःच्या ग्राहक सेवा केंद्रात लॅपटॉप आणि प्रिंटरवर नोटा छापल्याचे निष्पन्न झाले. आरोपी त्रिकुटाकडून सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि अन्य साहित्य जप्त केले. आरोपी आकाश माने, अरगडे आणि संभेराव यांची पोलिसांनी स्वतंत्र आणि समोरासमोर बसून चौकशी केली. या चौकशीत आकाशने त्याचा पुण्यातील मित्र थोरात याच्याकडून नोटा तयार करण्याचे तंत्र एक लाखात खरेदी केल्याचे सांगितले. हे तंत्र पेन ड्राइव्हमध्ये मिळाल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.
ग्राहक सेवा केंद्र चालक, शिवनेरी ड्राईव्हर आणि फायन्स एजेंट पोलिसांच्या ताब्यात https://t.co/wyrjxPPtg0
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) December 10, 2020
मानेला १४ पर्यंत पोलीस कोठडी
आरोपी आकाश माने याला तपास अधिकारी प्रवीण पाटील यांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कमिशन तत्त्वावर व्यवहार
आकाशने आरोपी अरगडे याला २० हजार रुपयांत एक लाखाच्या बनावट नोटा दिल्या होत्या. अरगडे याने यातील १० हजारांच्या बनावट नोटा संभेरावला दिल्या. त्याकरिता ३ हजार ५०० रुपये कमिशन ठरले होते. त्यापैकी दीड हजार रुपये संभेरावकडून अरगडेने घेतले होते. संभेराव हा बनावट नोटा विक्री करण्यासाठी ग्राहकांचा शोध घेत, एका जणाला एक लाख रुपये देण्यासाठी तो आला होता. ३५ हजारांत एक लाखाच्या बनावट नोटा विक्री करण्याची त्याची तयारी झाली होती.