तेहलका बलात्कार प्रकरण : पीडीतेची उलटतपासणीस सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 04:27 PM2019-10-21T16:27:26+5:302019-10-21T16:29:23+5:30
आजपासून सुरु झालेली उलट तपासणी तीन दिवसात संपवली जाईल.
पणजी - २०१३ साली गाजलेल्या तेहलका बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी पत्रकार तरुण तेजपाल याने या प्रकरणातील पीडीतेची उलटतपासणी पुढे ढकलण्याची केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने फेटाळून लावली होती. त्यानंतर आज म्हापसा कोर्टात पीडितेची इन कॅमेरा उलटतपासणी दुपारपासून सुरु झाली. म्हापसा कोर्टात तेजपाल आणि पीडित तरुणीचे वकील हे देखील हजर झाले आहे. आजपासून सुरु झालेली उलट तपासणी तीन दिवसात संपवली जाईल.
नुकतीच तेजपालने केलेली याचिका न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणीस आली होती. म्हापसा सत्र न्यायालयाने पीडीतेच्या उलटतपासणीसाठी येत्या २१, २२ आणि २३ असे तीन दिवस निश्चित केले होते. तेजपाल यांनी या तारखांना आपले वकील पुढील दोन महिने उपस्थित राहू शकणार नाहीत अशी सबब देत उलटतपासणी डिसेंबरपर्यंत पुढे ढकलावी यासाठी सत्र न्यायालयाच्या आदेशास हायकोर्टात आव्हान दिले.
या प्रकरणातील ट्रायल सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु झालेली आहे. परंतु आपल्यावर ठेवलेले आरोप रद्दबातल ठरवावेत या मागणीसाठी तेजपाल याने मध्यंतर सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. परंतु, त्याची याचिका निकालात काढताना सुप्रिम कोर्टाने ६ महिन्यांच्या आत ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश कनिष्ठ न्यायालयाला दिले होते.
२०१३ मध्ये बांबोळी येथील एका बड्या तारांकित हॉटेलमध्ये तेहलकाच्या इव्हेंटवेळी आपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपालवर आहे. त्याच्याविरुध्द भादंसंच्या कलम ३७६ (बलात्कार), ३४१, ३५४ अ आणि ३५४ ब खाली पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.
Goa: Cross examination of victim in the Tarun Tejpal sexual assault case has started, on camera. Lawyers of the victim and Tejpal are currently in Mapusa court. Cross examination will be over within three days(file pic) pic.twitter.com/ln2dQIg4LB
— ANI (@ANI) October 21, 2019