जन्मदात्या आई वडिलांनीच ८ लाख सुपारी देत लेकाला संपवलं; कारण ऐकून हैराण व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:23 PM2022-11-02T12:23:38+5:302022-11-02T12:23:48+5:30
आपल्याच मुलाच्या हत्येसाठी ५ जणांना तब्बल ८ लाखांची सुपारी देण्यात आली. इतकेच नाही तर पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही आई वडिलांनी केला
हैदराबाद - बाळ जन्मल्यापासून मोठं होईपर्यंत आई वडील त्याला जीवापाड जपतात. त्याचे सगळे हट्ट पुरवतात. जगातील सर्व सुख त्याला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. परंतु काही मुले आई वडिलांच्या प्रेमाला जागतात. हैदराबाद येथे मुलाच्या अत्याचाराला कंटाळून जन्मदात्या आई वडिलांनी असं पाऊल उचललं ते ऐकून कुणीही हैराण होईल. मुलाच्या छळाला कंटाळून आई वडिलांनी त्याची हत्या करण्याचा डाव आखला.
आपल्याच मुलाच्या हत्येसाठी ५ जणांना तब्बल ८ लाखांची सुपारी देण्यात आली. इतकेच नाही तर पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही आई वडिलांनी केला. परंतु एका चुकीमुळे आई वडील पोलिसांच्या जाळ्यात अडकले. हे प्रकरण तेलंगाणातील सूर्यापेटच्या तिरुमलगिरी येथील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २६ वर्षीय साईनाथच्या हत्येप्रकरणी आई वडील, काकांसह ७ जणांना अटक केली आहे. साईनाथ आई वडिलांचा छळ करायचा. त्यामुळे वडील राम सिंह आणि आई राणीबाईने त्याची हत्या करण्याचं षडयंत्र रचलं.
हुजूरनगर पोलिसांनी सांगितले की, राम सिंह आणि त्यांची पत्नी मुलाच्या वागणुकीमुळे त्रस्त होते. दोघंही या अत्याचाराला कंटाळले होते. त्यामुळे मुलाचा काटा काढण्यासाठी ८ लाख सुपारी देण्यात आली. ५ जणांनी साईनाथचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह मूसी नदीत फेकून देण्यात आला. स्थानिकांनी जेव्हा मृतदेह पाहिला त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता मृतदेह फेकण्यासाठी वापरण्यात आलेल्या कारबाबत पोलिसांना कळालं.
१० दिवसांनी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आई वडिलांना हॉस्पिटलला बोलावलं. त्यानंतर मृतदेह त्यांना ताब्यात दिला. पोलिसांनी जेव्हा आई वडिलांना बोलावलं तेव्हा ते त्याच कारने हॉस्पिटलला पोहचले ज्याचा वापर मृतदेह फेकण्यासाठी करण्यात आला होता. पोलिसांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा दोघांनी गुन्हा कबूल केला. मुलाच्या वागणुकीला कंटाळून ८ लाख देऊन त्याच्या हत्येची सुपारी दिली होती असं आई वडिलांनी म्हटलं. त्यानंतर पोलिसांनी या घटनेत आई वडिलांसह ७ आरोपींना अटक केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"