''लकी ड्रॉ''चे मानकरी असल्याचे सांगून त्रिकुटाने घातला अभियंत्याला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 08:20 PM2018-08-06T20:20:21+5:302018-08-06T20:21:55+5:30
टोळक्याने निलेशसह अनेक जणांना फसवलं असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांकडून करण्यात आला
नवी मुंबई - नवी मुंबईत तीन जणांच्या टोळक्याने एका अभियंत्याला ६० हजारांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. निलेश पाटील (वय - ३४) असं त्याच नाव असून तो सीबीडी बेलापूर येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता या त्रिकुटाचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या टोळक्याने निलेशसह अनेक जणांना फसवलं असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
निलेश पाटील हे तळोजा येथील काच बनविण्याच्या कंपनीमध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून काम करतात. विवेक रघुवंशी, मनीष मेहेता, प्रसाद शेट्टी, असं या टोळीताल तिघांची नावे असून त्यांनी सानपाडा येथील जी स्क्वेअर पार्क या कॉम्प्लेक्समध्ये प्रोग्रेशिआ इंटरनॅशनल हॉलिडे या नावाने भाड्याने ऑफिस सुरू केले होते. काही दिवसांपूर्वी या टोळीने निलेश यांना ते लकी ड्रॉचे मानकरी असल्याचं सांगत त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. त्यांनी निलेश यांना आपल्या कंपनीचे सदस्य होण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली होती. ज्यात एका दिवसासाठी क्लब, ब्युटीपार्लर, जीम त्याचबरोबर हॉलिडेसाठी मोफत राहण्याच्या सेवा यांचा समावेश होता. त्यासाठी त्यांनी निलेश यांच्याकडून तीन वर्षाच्या मेंबरशिपसाठी ६० हजार रुपयांची रक्कम वसूल केली होती. मार्च महिन्यात निलेश यांनी अनेक वेळा त्या तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्याशी संपर्क साधता येत नव्हता. त्यानंतर एकाशी संपर्क झाल्यानंतर त्याने तेथील नोकरी सोडून दिल्याचं सांगत त्याचा त्या कंपनीशी काही संपर्क नसल्याचं सांगितलं. अखेर निलेश यांना आपली फसवणूक झाल्याच लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच पुणे पोलीसही त्या तिघांच्या मागावर असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी इतरही पीडितांना त्या संबंधात तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.