रोज नोंदवले जातात दहा सायबर गुन्हे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 04:14 AM2019-12-09T04:14:21+5:302019-12-09T06:03:58+5:30
देशातील प्रगतशील राज्य म्हणून लौकिक असलेले महाराष्ट्रात राज्य आता सायबर गुन्ह्यांमध्येही आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.
- जमीर काझी
मुंबई : देशातील प्रगतशील राज्य म्हणून लौकिक असलेले महाराष्ट्रात राज्य आता सायबर गुन्ह्यांमध्येही आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. गेल्या दहा महिन्यांत ऑनलाइन गैरव्यवहार, फसवणुकीच्या तब्बल २,७८९ गुन्ह्यांची नोंद राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत झाली आहे. साधारणपणे दररोज १० सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल होत आहेत. १ जानेवारी, २०१५ ते ३१ ऑक्टोबर, २०१९ या कालावधीत एकूण तब्बल १०,१३९ गुन्हे दाखल झाले आहेत.
राज्यभरात डेबिट, क्रेडिट कार्ड, गुंतवणूक फसवणुकीबरोबरच नोकरी, विवाह नोंदणीबरोबरच सोशल मीडियातील गुन्ह्यांच्या प्रमाणाचा आलेख सातत्याने वाढत राहिलेला आहे. त्यावर प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी त्याला मर्यादा पडत आहेत, तसेच नागरिकही आपल्या सायबर सुरक्षेबाबत गाफील राहत असल्याचे स्पष्ट होत आहे.
माहिती अधिकार तंत्रज्ञान कायद्यांतर्गत या वर्षी १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर दहा महिन्यांमध्ये एकूण २,७८९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ९८६ गुन्हे आॅनलाइन बॅँकिंगचे आहेत. त्यानंतर डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या ८३३ तक्रारींची नोंद झालेली आहे. त्या खालोखाल सोशल मीडियाद्वारे फसवणूक झालेले ७७९ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे फसवणुकीचे ५४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सायबर गुन्ह्याच्या प्रतिबंध व तपासासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. दैनंदिन व्यवहारामध्ये इंटरनेट व आॅनलाइनचा वापर कैकपटीने वाढत आहे. त्याचा वापर करणाऱ्यांनी त्यासंबंधी योग्य खबरदारी घेतली पाहिजे. बॅँक खाते, ओटीपी क्रमांक इतरांना सांगू नयेत, त्यासंबंधी खबरदारीबाबत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे.
- बाळसिंग रजपूत, अधीक्षक, राज्य सायबर गुन्हे प्रतिबंधक विभाग
या वर्षी ३१ ऑक्टोबरअखेर दाखल सोशल मीडिया व ई-मेलसंबंधी गुन्हे
प्रकार गुन्हे
सोशल मीडिया ५४९
ई-मेल २४
अन्य २०६
एकूण ७७९