विमानतळावर प्रवाशाच्या ‘चेक इन बॅगेज’मधून १० सोन्याची बिस्कीटं, १ सोन्याचे नाणे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:22 PM2021-05-08T17:22:42+5:302021-05-08T17:24:20+5:30
Gold Smuggling : जप्त केलेल्या त्या तस्करीच्या सोन्याची कींमत ४९ लाख ८९ हजार असून याप्रकरणात त्या प्रवाशाला अटक करण्यात आल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली.
वास्को - शारजाहून दाबोळी विमानतळावर आलेल्या ‘एअर एरेबीया’ विमानातील एका प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी १ किलो १७५ ग्राम वजनाचे तस्करीचे सोने जप्त केले. जप्त केलेल्या त्या तस्करीच्या सोन्याची कींमत ४९ लाख ८९ हजार असून याप्रकरणात त्या प्रवाशाला अटक करण्यात आल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली.
शनिवारी पहाटे दाबोळी विमानतळावर सारजाहून आलेल्या त्या विमानातील प्रवाशांची कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त वाय. बी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टम अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येत होते. यावेळी त्यांना एका प्रवाशावर संशय आल्याने त्याची कसून तपासणी केली. या तपासणीवेळी त्यांना त्या प्रवाशाच्या ‘चेक इन बॅगेज’मधून दहा सोन्याच्या बिस्कीट व एक सोन्याचे नाणे सापडले. त्या प्रवाशाने आणलेल्या या तस्करीच्या सोन्याचे एकूण वजन १ कीलो १७५ ग्राम असल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांनी देऊन त्याची एकूण किंमत ४९ लाख ८९ हजार रुपये असल्याचे सांगितले. तस्करीचे सोने आणलेल्या त्या प्रवाशाशी नंतर कस्टम अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असता तो भटकळ, कर्नाटक येथील असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणात कस्टम कायद्याखाली ते सोने जप्त करण्याबरोबरच त्या प्रवाशालाही अटक केल्याची माहीती प्राप्त झाली. त्या प्रवाशाने हे तस्करीचे सोने येथे आणल्यानंतर तो ते कुठे नेणार होता, याप्रकरणात त्याच्याबरोबर अन्य कोणी साथिदार आहे का अशा विविध गोष्टीबाबत कस्टम अधिकारी अधिक तपास करित आहेत.
२०२१ वर्षाच्या सुरवातीपासून अजूनपर्यंत दाबोळी विमानतळावर जप्त केले २ कोटी ३१ लाखांचे तस्करीचे सोने मागील पाच महीन्यात दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी विविध कारवाईत २ कोटी ३१ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. गेल्या दोन आठवड्यातच कस्टम अधिकाऱ्यांनी दाबोळी विमानतळावर तीन वेगवेगळ्या कारवाईत १ कीलो ९१९ ग्रामच्या आसपास तस्करीचे सोने जप्त केले आहे. तीनही प्रकरणात मिळून जप्त केलेल्या त्या तस्करीच्या सोन्याची कींमत ८१ लाख ७० हजार ४७४ रुपये असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.