भिवंडीत दहा किलो गांजा जप्त; दोन महिन्यात १९ किलो पोलिसांनी केला जप्त
By नितीन पंडित | Published: March 1, 2024 07:12 PM2024-03-01T19:12:59+5:302024-03-01T19:13:06+5:30
आरोपींकडून २ लाख १० हजार रुपयांचा गांजा,रिक्षा व मोबाईल असा एकूण ३ लाख ४० हजार ७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
भिवंडी: शहरात शांतीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करीत दोघा जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून २ लाख १० हजार रुपयांचा गांजा,रिक्षा व मोबाईल असा एकूण ३ लाख ४० हजार ७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
शांतीनगर हद्दीत दोन इसम गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांना मिळाली.त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकातील कर्मचारी संतोष पवार,किरण जाधव,श्रीकांत पाटील,रोशन जाधव,रवींद्र पाटील,नरसिंह क्षीरसागर यांनी पाईप लाईन रोड पोगाव चौकी जवळ सापळा लावला असता त्याठिकाणी संशयित दोन इसम रिक्षामधून आले असता पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांच्या रिक्षात १० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.
याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालक गुलाब हुसेन इस्राईलमियाँ सलमानी वय २२ व सादीकअली बहादुर खान वय २७ वर्ष दोघे रा.टिटवाळा रोड, बनेली गाव ता.कल्याण या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लाख १० हजार रुपयांचा गांजा,रिक्षा व मोबाईल असा एकूण ३ लाख ४० हजार ७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे २०२४ मध्ये शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली मादक नशेचे पदार्थ विकणाऱ्यां विरोधात विशेष मोहीम सुरू केली ज्यामध्ये तीन गुन्ह्यात एकूण १९ किलो ६५० ग्रॅम वजनाचा ६ लाख ४ हजार २७० रुपये किमतीचा गांजा जप्त करीत आठ आरोपींना अटक केली आहे. तर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ११२ व्यक्तीं विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे ही अमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी यावेळी दिली आहे.