राज्यात अ‍ॅट्रोसिटीचे दहा हजार गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 06:54 AM2019-06-26T06:54:23+5:302019-06-26T06:54:33+5:30

अनुसूचित जाती व जमातीच्या संरक्षण व हक्कासाठी घटनेमध्ये विशेष कायद्याची तरतूद असली, तरी तो कागदावरच अस्तित्वात असल्याची परिस्थिती आहे.

Ten thousand cases of Atrocity filed in the state | राज्यात अ‍ॅट्रोसिटीचे दहा हजार गुन्हे दाखल

राज्यात अ‍ॅट्रोसिटीचे दहा हजार गुन्हे दाखल

Next

- जमीर काझी
मुंबई  - अनुसूचित जाती व जमातीच्या संरक्षण व हक्कासाठी घटनेमध्ये विशेष कायद्याची तरतूद असली, तरी तो कागदावरच अस्तित्वात असल्याची परिस्थिती आहे. राज्यात यासंबंधीच्या अत्याचाराचा आलेख वाढत राहिला असून, गेल्या सव्वा पाच वर्षांत ‘अ‍ॅट्रोसिटी’चे तब्बल ९,९८२ गुन्हे राज्यभरात दाखल आहेत. त्यापैकी सर्वाधिक ९,४८७ अनुसूचित जाती (एससी) समाजासंबंधीत गुन्हे आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण राज्यात सर्वात पुढे आहे. त्या खालोखाल अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक आहे.

राज्यात दाखल गुन्ह्यांपैकी जवळपास १२ टक्क्यांवर म्हणजे १,२५० गुन्ह्यांचा अद्याप तपासच पूर्ण झालेला नाही. त्यामुळे त्यातील आरोपी मोकाटपणे फिरत आहेत. १ जानेवारी, २०१४ ते ३१ मार्च, २०१९ या कालावधीतील दाखल गुन्ह्यांची ही माहिती आहे. पोलीस मुख्यालयातून माहिती अधिकार कायद्यान्वये ही माहिती हाती लागली आहे. अर्थात, ही आकडेवारी पोलिसांच्या दप्तरी दाखल गुन्ह्यांची आहे. प्रत्यक्षात त्याचे प्रमाण अधिक असल्याची शक्यता आहे.
गेल्या सव्वा पाच वर्षांमध्ये राज्यात ९ हजार ९८२ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये ‘एससी’ अत्याचाराच्या ९,४८७ तर ‘एसटी’ अत्याचाराच्या २,४७९ घटना घडल्या आहेत, तर ‘पीसीआर’(नागरी हक्क संरक्षण) १६ प्रकरणे दाखल आहेत. यापैकी १,२५० गुन्ह्यांचा तपास पोलिसांना पूर्ण करता आलेला नाही. तपासाबाबत उदासीनता दाखविल्याने आरोपीला अटक करणे तर दूरच, पोलिसांना सबळ पुरावेसुद्धा अद्याप जमा करण्यात अपयश आल्याची परिस्थिती आहे.

पुणे ग्रामीण पोलीस घटकामध्ये सर्वाधिक ६६५ प्रकरणे दाखल आहेत, तर यवतमाळ (६६०), अहमदनगर(६०८) व सोलापूर (५६२) जिल्ह्यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. अन्य जिल्ह्यांतही अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
होत आहे.
(उद्याच्या अंकात: सिद्ध गुन्ह्यांचे प्रमाण अवघे १४ टक्के; नऊ हजारांवर खटले प्रलंबित)

मुंबई महानगरात एक हजाराहून अधिक गुन्हे
मुंबई महानगरांतर्गत येणाऱ्या पाच पोलीस घटकांमध्ये गेल्या सव्वा पाच वर्षांत ‘अ‍ॅट्रोसिटी’चे एकूण १,०६६ गुन्हे दाखल आहेत.
त्यामध्ये मुंबई (१९३), नवी मुंबई (२३२), ठाणे (१९९), पालघर (१२३), रायगड (१८०) गुन्ह्यांचा समावेश आहे.

मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील डॉ. पायल तडवी हिने वरिष्ठ सहकाऱ्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर, अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तींचा होणारा छळ व अत्याचाराबाबत देशभरात मोर्चे काढत निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘अ‍ॅट्रोसिटी’च्या गुन्ह्यासंबंधीच्या सद्यस्थितीचा आढावा घेणारी ही वृत्त मालिका...

Web Title: Ten thousand cases of Atrocity filed in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.