२०१९ मध्ये तुरुंगांतील अतिरिक्त गर्दीचा दहा वर्षांतील उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:19 AM2020-09-08T00:19:03+5:302020-09-08T00:19:30+5:30
भारतीय कारागृहांत अनेक दशकांपासून क्षमतेपेक्षा अधिक कैदी
नवी दिल्ली : भारतातील तुरुंगांत अनेक दशकांपासून क्षमतेपेक्षा जास्त कैदी राहत असले तरी तुरुंगांतील ही अतिरिक्त गर्दी आता विकोपाला गेली असल्याचे राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थेने (एनसीआरबी) याच आठवड्यात जारी केलेल्या २0१९ मधील गुन्हेगारीविषयक आकडेवारीतून समोर आले आहे. ३१ डिसेंबर २0१९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील तुरुंगांत ४,७८,६00 कैदी आहेत.
कैदी सामावून घेण्याची तुरुंगांची वास्तवातील एकत्रित क्षमता मात्र केवळ ४,0३,७00 इतकी आहे. याचाच अर्थ भारतीय तुरुंगांतील कैद्यांची संख्या ११८.५ टक्के अधिक आहे. २0१0 पासूनच्या काळातील ही सर्वाधिक संख्या आहे. २0१८ पेक्षा हा आकडा १ टक्क्याने जास्त आहे.
क्षमतेक्षा जास्त कैदी असलेल्या राज्यांची संख्या २0१८ मध्ये १८ होती. २0१९ मध्ये ती २१ झाली आहे. ११ राज्यांतील तुरुंगांत सलग पाचव्या वर्षी क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. दिल्लीतील तुरुंगांत सर्वाधिक अतिरिक्त गर्दी दिसून आली. १0 हजार कैदी ठेवण्याची क्षमता असताना दिल्लीतील तुरुंगांत १७,५00 कैदी डांबण्यात आले आहेत. येथील अतिरिक्त गर्दीचे प्रमाण १७५ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशात १६८ टक्के आणि तिसºया क्रमांकावरील उत्तराखंडमध्ये १५८ टक्के कैद्यांची अतिरिक्त गर्दी आहे.
५0 पेक्षा अधिक वय असलेले कैदी अधिक
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तुरुंगांतील अतिरिक्त गर्दी चिंतेचा विषय ठरली आहे. देशातील अनेक तुरुंगांत कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. भारतीय तुरुंगांतील प्रत्येक आठ कैद्यांमागे १ कैदी ५0 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. या वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास घातक गुंतागुंत होण्याचा सर्वाधिक धोका असतो. विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी या संस्थेच्या संचालिका नेहा सिंघल यांनी सांगितले की, तुरुंगांतील कैद्यांची अतिरिक्त गर्दी तातडीने कमी करण्याची गरज आहे. तुरुंगांचे व्यवस्थापन नेहमीच कठीण असते, पण आताच्या परिस्थितीत व्यवस्थापनासाठी दुस्वप्न ठरू शकते.