जंगलात गेलेल्या आदिवासी महिलेची हत्या झाल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 10:03 PM2021-03-19T22:03:05+5:302021-03-19T22:03:40+5:30
Murder Case : नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्रीच्या सुमारास महिलेचा मृतदेह नातेवाईकांना शेलार हद्दीतील जंगलात आढळला.
भिवंडी - बकऱ्या चरण्यासाठी जंगलात गेलेल्या आदिवासी महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी शेलार गावच्या हद्दीत असलेल्या एका जंगलात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी या महिलेच्या हत्येची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . काटई ग्राम पंचायत हद्दीतील डोंगरपाडा मांगत पाडा येथील ३३ वर्षीय आदिवासी महिला गुरुवारी सायंकाळी घरातील बकऱ्या चरण्यासाठी घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेलार गावाजवळील जोगमोरी या जंगल परिसरात गेली होती . मात्र सदर महिला रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्रीच्या सुमारास महिलेचा मृतदेह नातेवाईकांना शेलार हद्दीतील जंगलात आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे सकाळी तालुका पोलीस ठाण्यात या महिलेच्या मृत्यूची नोंद आकस्मित निधन म्हणून करण्यात येत असतांना महिलेच्या नातेवाईकांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता कार्यकर्त्यांनी महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा सखोल तपास करण्याचा आग्रह तालुका पोलिसांकडे धरला असता अखेर शुक्रवारी सायंकाळी या महिलेच्या हत्येची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्या संदर्भातील प्रक्रिया सुरु आहे. भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेत शवविच्छेदना साठी शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. मात्र घटनास्थळी मृत महिलेचे अंतवस्त्र व ओढणी आढळून आली असून अंगावरचे दागीने व मोबाईल आढळून आला नसल्याने त्यामुळे महिलेवर शारिरीक अत्याचार करून सदर महिलेची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर घटनेच्या १८ तासा नंतरही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला नसून आपल्या पत्नीच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी व पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला कठोर शासन करावे अशी मागणी मृत महिलेचा पती जीवन दिघे याने केली आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक , उपअधीक्षक तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भेट दिली आहे.