दोन गटातील किरकोळ कारणावरील वादाने पूर्णेत तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 06:36 PM2018-08-25T18:36:03+5:302018-08-25T18:37:09+5:30
बसस्थानक परिसरात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादानंतर शहरात तणाव निर्माण झाला.
पूर्णा (परभणी) : बसस्थानक परिसरात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादानंतर शहरात तणाव निर्माण झाला. अचानक दोन गट आमनेसामने येऊन दगडफेक झाल्याने बाजारपेठ बंद करण्यात आली. सुमारे ३ तासानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाद निवळला असून आता शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
बसस्थानकासमोरील रस्त्यावर किरकोळ कारणावरून दुपारी दोन गटात वाद झाला. यातून एका गटाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या कार्यालयात जाऊन नासधूस केली. तसेच शहरातील बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुख्य बाजारपेठेत दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तब्बल ३ तासानंतर परिस्थिती आटोक्यात आली.
परभणीचे जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय हे पूर्णा येथे दाखल झाले आहेत. सध्या शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे.