भीषण अपघात! बाप-लेकीला चिरडून केले ठार, फरार झालेल्या ट्रकचालकाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 09:21 PM2022-02-08T21:21:27+5:302022-02-08T21:22:00+5:30
Accident Case : लातुरातील घटना : अपघातानंतर झाला होता फरार
लातूर : औसा तालुक्यातील शिवणी येथील शिक्षक हे आपल्या मुलीला शाळेत साेडण्यासाठी माेटारसायकलवरून लातूरकडे येत हाेते. दरम्यान, भरधाव ट्रकचालकाने त्या बाप-लेकीला चिरडल्याची घटना लातुरातील बाभळगाव नाका परिसरात ३१ जानेवारी राेजी घडली हाेती. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला हाेता. या चालकाला मंगळवारी कर्नाटकातून ट्रकसह अटक करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, ३१ जानेवारी रोजी सकाळी शिवणी (ता. औसा) येथील दत्तात्रय पांचाळ (३८) आणि त्यांची मुलगी प्रतीक्षा पांचाळ (१४), यांंना शाळेत सोडण्यासाठी लातूरला माेटारसायकलवरून येत हाेते. दरम्यान, सकाळी ८.५० वाजेच्या सुमारास बाभळगाव रोड, म्हाडा कॉलनी प्रवेशद्वारासमाेरील रस्त्यावरच पाठीमागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने मोटारसायकलला चिरडले. या भीषण अपघातात दत्तात्रय पांचाळ आणि त्यांची मुलगी, हे दोघेही जागीच ठार झाले. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळावरून लोकांची नजर चुकवून फरार झाला हाेता.
याबाबत विवेकानंद चाैक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या अपघाताच्या घटनेत फरार झालेल्या चालकाचा शोध घेण्यासाठी पाेलीस मागावर हाेते. याबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सूचना केल्या. अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह पाेलीस अंमलदारांचे पथक नियुक्त करण्यात आले. पाेलिसांनी अपघातातील ट्रक आणि चालकाचा सर्वत्र शाेध घेतला. घटनास्थळावरील साक्षीदार आणि शहराबाहेरून जाणाऱ्या रस्त्यावर उपलब्ध असलेल्या अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची चार दिवस सलग पाहणी केली. अनेक सीसीटीव्ही फुटेजचा डेटा संकलित करून तपास करण्यात आला. या सीसीटीव्हीच्या आधारे अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचा शाेध लागला. त्यानुसार बीदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथून चालक मुनिरोद्दीन खुदबुद्दीन (४८, रा. बसवकल्याण) याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जे.बी. मानुल्ला करीत आहेत.