भीषण अपघात! कंटेनरने केला मिनीऑटोचा चेंदामेंदा, तीनजणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:18 PM2022-04-19T16:18:03+5:302022-04-19T16:19:00+5:30
Accident Case : या भीषण अपघातात प्रवासी अयुब फजरोद्दीन हे जागीच ठार झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी खासगी वाहनातून गंभीर जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
मलकापूर (बुलडाणा) : भरघाव कंटनेर व मिनीऑटोच्या भीषण अपघातात तीनजण ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग ६ वर तांदुळवाडी पुलानजीक वळणावर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली.
गोविंदा श्रावण जाहीर (२६, रा. शिवतारा ता. हदगाव जि.नांदेड, ह.मु.बुलडाणा) यांच्या मालकीचे मिनीऑटो एमएच-२०, डिसी-२७८४ वाहन आहे. त्याद्वारे भाड्याने मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करतो. त्यानुसार बुलडाणा येथील बसस्थानकालगत मुक्कामी असलेले गाझियाबाद उत्तर प्रदेश येथील रहिवासी अयुब फजरोद्दीन (५०), नफीज खान (२७) हे दोघे बॅग विक्री करण्यासाठी मिनीऑटोने मंगळवारी सकाळी ८ वाजता मुक्ताईनगरकडे निघाले होते. मलकापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ६ वर तांदुळवाडी पुलानजीक वळणावर मिनीऑटो व भरघाव कंटेनर क्रमांक एनएल-०१, एइ-४५४३ यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात मिनीऑटोचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. नंतर कंटेनर पुढे जाऊन थांबला व त्यातील चालक व वाहकाने पोबारा केला.
या भीषण अपघातात प्रवासी अयुब फजरोद्दीन हे जागीच ठार झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी खासगी वाहनातून गंभीर जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. रुग्णालयात उपचारादरम्यान नफिस खानचा मृत्यू झाला. मिनीऑटोचालक गोविंदा जाहीर याची तब्येत खालावल्याने त्याला बुलढाणा हलविण्यात आले. मात्र, पंधरा मिनिटांत दाताळ्यानजीक चालत्या गाडीतच गोविंदा मरण पावला. घटनेची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमींना उपचारासाठी हलविले. तब्बल दोन तासांनी मृतांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधला असून तपास सुरू आहे.