थरारक! पत्नीशी वादानंतर युवकानं तोंडात डायनामाईट बॉम्ब ठेवला अन् क्षणातच...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 12:42 PM2022-11-29T12:42:05+5:302022-11-29T12:42:59+5:30
तरुणाने उचललेल्या या भीषण पावलाने गावकऱ्यांनाही धक्का बसला
लातेहार - झारखंडमध्ये लातेहार जिल्ह्यात पत्नी आणि सासरच्या मंडळींशी झालेल्या वादानंतर युवकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. मानसिक तणावाखाली एका तरुणाने तोंडात डायनामाईट बॉम्ब ठेवून स्वत:ला उडवले. डायनामाईट बॉम्बस्फोटामुळे तरुणाच्या गळ्यावरच्या भागाच्या चिंधड्या उडाल्या. संपूर्ण शरीर आगीत जळालं. या घटनेत तरुणाचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला.
तरुणाने उचललेल्या या भीषण पाऊलाने गावकऱ्यांनाही धक्का बसला. झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील कोरवाटोली येथे सासरी गेलेल्या चालितर सिंहने पत्नी आणि सासरच्या लोकांशी झालेल्या वादानंतर डायनामाइट बॉम्बने स्वत:ला उडवले. मृत चालितर सिंह हा धुंडू गावचा रहिवासी होता. गेल्या १५ दिवसांपासून ते कोरवटोली त्याच्या सासरी आला होता.
मृत तरुण दगडखाणीत काम करायचा
मृत चलितर सिंह हा मनिका येथील दगडखाणीत मजूर म्हणून काम करायचा. खाणीत स्फोटकांसाठी वापरण्यात येणारे डायनामाइट त्याने सोबत आणले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. सोमवारी सायंकाळी पत्नी व इतर सासरच्या मंडळींशी वाद झाल्यानंतर त्याने तोंडात डायनामाईट टाकून मोबाईल बॅटरीच्या साहाय्याने त्याचा स्फोट केला. हा स्फोट इतका जोरदार होता की, तरुणाच्या शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे झाले.
२५ वर्षीय मृत चलितर सिंहची सासू रामकली देवी यांनी सांगितले की, त्यांचा जावई गेल्या काही दिवसांपासून विचित्र वागत होता. घरच्यांना काही समजण्याआधीच त्याने अचानक त्याच्या बॅगेतून काहीतरी काढून तोंडात ठेवलं, तेव्हा मोठा स्फोट झाला, त्यात चलितर सिंहचा जागीच मृत्यू झाला. डायनामाईटने तरुणानं स्वत:ला उडवून घेतल्याची माहिती मिळताच गरु पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. घरात तपासादरम्यान, पोलिसांनी आणखी एक डिटोनेटर जप्त केला आणि त्यांच्यासोबत नेला. कुटुंबीयांकडून आवश्यक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी चलितर सिंहचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी लातेहार सदर रुग्णालयात पाठवला. कौटुंबिक कलहामुळे तरुणाने उचललेल्या या भयंकर पावलामुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"